बारामती-वृत्तसेवा । बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली असून, काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग अधिकच सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये ही पोटनिवडणूक होत असून, ती बिनविरोध व्हावी यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू होते. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुरुवातीला काँग्रेसनेही आपला उमेदवार मैदानात उतरवला होता. मात्र, बारामतीतील राजकीय समीकरणे आणि स्थानिक भावना लक्षात घेता, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून काँग्रेसवर दबाव वाढत होता.

शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी काँग्रेस नेतृत्वाला विनंती करत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी थेट संपर्क साधून निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली. अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस जवळ आल्याने या घडामोडींना अधिक वेग आला.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वपूर्ण संकेत देत उमेदवारी मागे घेण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, अंतिम निर्णय घेण्यापूर्वी दिल्लीतील हायकमांडशी चर्चा आवश्यक असून, त्यांचा आदेश आल्यानंतर औपचारिक प्रक्रिया सुरू होईल. स्थानिक परिस्थिती, सर्वपक्षीय भावना आणि वरिष्ठांकडून आलेले फोन लक्षात घेता निवडणुकीतून माघार घेण्याचा कल दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी हेही स्पष्ट केले की, पक्षांतर्गत सर्वांचे एकमत साधले गेले आहे.
दरम्यान, काँग्रेसमध्ये या निर्णयावर अजूनही पूर्ण एकमत झाल्याचे चित्र नाही. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी सतत संपर्कात असून, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतही चर्चा सुरू आहे. रमेश चेन्निथला यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांमध्येही याबाबत सविस्तर चर्चा सुरू असल्याचे समजते. वडेट्टीवार यांनी माघारीचे संकेत दिले असले तरी अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.
काँग्रेस हायकमांडचा अंतिम निर्णय येण्यापूर्वीच माघारीची चर्चा पुढे आल्याने पक्षांतर्गत समन्वयाच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तरीही, बारामतीतील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेस माघार घेण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.



