Home Cities मुक्ताईनगर दुबे तुमचे जावई आहेत का?; रोहिणी खडसेंचा संताप

दुबे तुमचे जावई आहेत का?; रोहिणी खडसेंचा संताप


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुणे जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य भाविकांसाठी बंद असलेले मंदिर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आल्याचा आरोप समोर आला असून या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या नेत्या रोहिणी खडसे यांनी या प्रकरणी प्रशासनाला धारेवर धरत निशिकांत दुबे तुमचे जावई आहेत का? असा तीव्र सवाल उपस्थित केला आहे.

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात सध्या सभामंडप आणि पायरी मार्गाच्या बांधकामाचे काम सुरू असल्याने ९ जानेवारीपासून सुमारे तीन महिन्यांसाठी मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. या कालावधीत कुणालाही दर्शनासाठी परवानगी दिली जात नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. सुरुवातीला महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र नंतर तोही रद्द करण्यात आला. भाविकांनी हा निर्णय मान्य केला असताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती समोर येताच संताप व्यक्त केला जात आहे.

मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून सर्वसामान्यांसाठी कडक नियम लागू केले जात असताना राजकीय नेत्यांसाठी वेगळे नियम लागू केले जातात का, असा सवाल भाविकांकडून उपस्थित केला जात आहे. महादेवाच्या मंदिरात असा दुजाभाव का केला जात आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर गेल्या अडीच महिन्यांपासून सर्वसामान्य भाविकांसाठी बंद आहे; मात्र भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी ते खुले करण्यात आले. दुबे हे वारंवार मराठी माणसाबद्दल अवमानकारक वक्तव्य करतात आणि मराठी स्वाभिमान दुखावतात. अशा व्यक्तीसाठी महाराष्ट्रातील प्रशासन पायघड्या घालत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सामान्य माणसांसाठी एक नियम आणि महाराष्ट्रद्रोही निशिकांत दुबे यांच्यासाठी वेगळा नियम का, दुबे तुमचे जावई आहेत का, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान या प्रकरणाबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी मात्र आपल्याला याची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले आहे. भीमाशंकर मंदिराचे काम सुरू असल्याने ९ जानेवारीपासून तीन महिन्यांसाठी मंदिर बंद आहे आणि या कालावधीत कुणालाही दर्शनासाठी परवानगी दिलेली नाही. खासदारांनी दर्शन घेतल्याची माहिती आपल्याकडे नाही. जिल्हा प्रशासनाने अशी कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचे सांगत या प्रकरणाची चौकशी करून माहिती देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound