एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील वरखेडी शिवारातील बहुतांश ठिकाणी तालुका कृषी विभागातर्फे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पावसाळ्यातील पाणी थांबुन रहावे,यासाठी बांधबंडीगकरण करून मिळत आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र काही ठिकाणी बांधबंडीगच्या नावावर सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून काम होत असल्याचा आरोप होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सद्य स्थितीत महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले असतांना खाजगी संस्था तसेच राज्यसरकारतर्फे ‘पाणी अडवा,पाणी जिरवा’ या मोहिमेवर विशेष भर देऊन लाखो रुपये खर्च केले जात आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनातर्फे तालुका कृषी कार्यालयाकडून राज्यातील शेतकऱ्यांना बांधबंडीगकरण करून दिले जात आहे. या बांधबंडीगमुळे पावसाळ्यात येणाऱ्या पाण्यामुळे शेतात पाणी यायचं व त्या पाण्यामुळे बहुतांश शेतातील माती वाहून जात होती. त्यामुळे पिकाला मोठी हानी होत होती व शेतक-याचे मोठे नुकसान होत होते. या सर्व गोष्टींचा विचार लक्षात घेता शासनातर्फे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात बांधबंडीगकरण करून दिले जात आहे. परंतु एरंडोल तालुक्यातील वरखेडी शिवारात सदर काम हे शासकीय नियमात होत नसून याबाबत पत्रकारांनी वरखेडी शिवारातील काही शेतांना भेटी दिल्या व स्वतः पाहणी केल्यावर हे लक्षात आले की, बांधबंडी होत असतांना काही शेतात जेवढ्या प्रमाणात शेतात खोलीकरण झाले पाहिजे, त्या प्रमाणात खोलीकरण होत नसून फक्त वरचेवर जे.सी.बी.द्वारे खोदकाम सुरु आहे.
दरम्यान शेतकऱ्यांच्या तक्रारी नुसार सदर कामाची सविस्तर माहिती एरंडोल कृषी अधिकारी आर.एच.पाटील यांना मागितल्यावर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन सदर माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळेच ठेकेदारास पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे. सदर कामाचे वरिष्ठांकडून सखोल पारदर्शक चौकशी करण्यात यावी व शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनातर्फे लाखो रुपये खर्च करून सदर योजना कार्यान्वित करण्यात येत असतांना शासकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे कार्यालायातूनच उंटावर बसून शेळी हाकण्याचे काम होत असल्याचा आरोप शेतक-यांकडून होतोय.