नवी दिल्ली वृत्तसंस्था । शेतकरी आंदोलन चिघळल्याने पंतप्रधान मोदी हे शीख समुदायाचे हितकर्ते असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने सुरू केला आहे. यासाठी आयआरसीटीसीने याच आशयाचे सुमारे दोन कोटी मेल पाठविल्याची माहिती समोर आली आहे.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसी या रेल्वे सार्वजनिक उपक्रमाने आपल्या ग्राहकांना पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारचे शीखांशी खास संबंध हे ४७ पृष्ठांची एक पुस्तिका पाठविली आहे. याचा हेतू लोकांना कायद्यांबद्दल जागरूक करणे आणि त्याबद्दलची नाराजी दूर करणे आहे. ही पुस्तीका हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेत आहे.
या पुस्तिकेत १९८४ दंगलीतील पीडितांना देण्यात आलेला न्याय, जालियनवाला बाग स्मारक, करमुक्त लंगर, कर्तारपूर कोरिडोअर अशा एकूण १३ निर्णयांचा उल्लेख आहे. १ डिसेंबरला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, हरदीप सिंह पूरी यांनी गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं होतं.
आयआरसीटीसीमध्ये प्रवासी तिकिटे बुक करताना त्यांची माहिती देतात. यातून जमा झालेल्या ई-मेलचा यासाठी वापर करण्यात आला आहे. रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, आयआरसीटीसीने १२ डिसेंबरपर्यंत १.९० कोटी ईमेल पाठवले आहेत. आयआरसीटीसीने फक्त शीख ग्राहकांना हा ईमेल पाठवल्याचा आरोप फेटाळला आहे. ईमेल सर्वांना पाठवण्यात आले आहेत, कोणत्याही ठराविक समाजाला नाही. याआधीही लोककल्याण योजनांसाठी आयआरसीटीसीकडून अशा पद्धतीने पुढाकार घेण्यात आला आहे, अशी माहिती अधिकार्याने दिली आहे.