Home आंतरराष्ट्रीय इराणचा कतारमधील अमेरिकन रडारवर हल्ला?  मध्यपूर्वेत तणाव वाढला

इराणचा कतारमधील अमेरिकन रडारवर हल्ला?  मध्यपूर्वेत तणाव वाढला


दोहा- वृत्तसेवा ।  अमेरिकेविरुद्ध सूड उगवण्याच्या उद्देशाने इराणने कतारमधील एका महत्त्वाच्या अमेरिकन रडार सिस्टीमला लक्ष्य केल्याचा दावा समोर आला आहे. उपग्रह प्रतिमांच्या आधारे हा हल्ला झाल्याचे सांगितले जात असून, अमेरिकन स्पेस फोर्सचे अत्याधुनिक AN/FPS-132 बॅलिस्टिक मिसाइल अर्ली वॉर्निंग रडार मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्याची माहिती इराणी माध्यमांतून दिली जात आहे. सुमारे 1.1 अब्ज डॉलर्स (अंदाजे ₹9,000 कोटी) किमतीची ही प्रणाली मध्यपूर्वेतील अमेरिकेच्या सर्वात महत्त्वाच्या संरक्षण साधनांपैकी एक मानली जाते.

हे रडार कतारमधील अल उदेद एअर बेस परिसरात २०१३ साली स्थापित करण्यात आले होते. अल उदेद हा मध्यपूर्वेतील अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ मानला जातो. संबंधित AN/FPS-132 रडारची शोध क्षमता सुमारे ५,००० किलोमीटरपर्यंत असून, येणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वेग, दिशा आणि संभाव्य लक्ष्य याबाबत त्वरित माहिती देण्याचे काम ही प्रणाली करते. या माहितीच्या आधारे पॅट्रियट आणि THAADसारख्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली तत्काळ सक्रिय केल्या जातात.

इराणी मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने या कारवाईला “ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४” असे नाव दिले आहे. अलीकडील अमेरिका आणि इस्रायलच्या कारवायांना प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे. इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर केला असल्याचे सांगितले जाते. कतारच्या संरक्षण मंत्रालयाने बहुतेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच पाडण्यात आल्याचे स्पष्ट केले असले, तरी काही हल्ले अल उदेद तळाजवळ कोसळल्याची कबुली दिली आहे.

काही आंतरराष्ट्रीय वृत्तांनुसार, एका ड्रोनने थेट रडार साइटला लक्ष्य केले. इराणी माध्यमांनी रडार पूर्णतः नष्ट झाल्याचा दावा केला आहे. मात्र अमेरिका आणि कतार सरकारकडून अद्याप संपूर्ण नुकसानीबाबत अधिकृत तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. कतारने या हल्ल्यात काही प्रमाणात नुकसान झाले असून आठ जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे.

तज्ज्ञांच्या मते, जर ही रडार प्रणाली दीर्घकाळ सेवाबाहेर राहिली, तर अमेरिका आणि तिच्या सहयोगी देशांची क्षेपणास्त्र इशारा देण्याची क्षमता कमी होऊ शकते. इशारा देण्याचा कालावधी घटल्यास सुरक्षेचा धोका वाढण्याची शक्यता आहे. या घटनेतून एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे—अत्यंत महागड्या आणि प्रगत संरक्षण प्रणालींनाही तुलनेने कमी किमतीच्या ड्रोनद्वारे मोठे नुकसान पोहोचवता येऊ शकते.

या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेला या प्रदेशातील आपली संरक्षण यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज भासू शकते, तर इराण-अमेरिका संघर्षाचे पडसाद जागतिक सुरक्षेवरही उमटू शकतात. सध्याच्या परिस्थितीत दोन्ही देशांकडून अधिकृत प्रतिक्रिया आणि पुढील लष्करी हालचालींकडे जगाचे लक्ष लागले आहे.

 


Protected Content

Play sound