मुंबई- वृत्तसेवा । आयपीएल 2026 स्पर्धेची सुरुवातच दमदार झाली असून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने विजयी सलामी देत प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला आहे. या सामन्यात स्टार फलंदाज Virat Kohli याने नाबाद अर्धशतक झळकावत केवळ संघाला विजय मिळवून दिला नाही, तर अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर करत क्रिकेटप्रेमींना भारावून टाकले.
आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात Royal Challengers Bengaluru ने Sunrisers Hyderabad संघाचा 6 गडी राखून पराभव केला. हैदराबादने दिलेल्या 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीने अवघ्या 15.4 षटकांत लक्ष्य गाठले. या धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने 38 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या जोरावर नाबाद 69 धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीमुळे संघाचा विजय अधिक सोपा झाला.

या सामन्यात विराट कोहलीने धावांचा पाठलाग करताना आयपीएलमध्ये 4000 धावांचा टप्पा ओलांडला आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. याशिवाय, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वाधिक 7 अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर जमा झाला आहे.
कोहलीने या खेळीदरम्यान David Warner याचा आणखी एक विक्रम मोडीत काढला. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा टॉप स्कोरर राहण्याच्या बाबतीत तो आता वॉर्नरच्या पुढे गेला आहे. तसेच विजयी सामन्यांमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर गेला असून त्याने 42 वेळा ही कामगिरी केली आहे, तर वॉर्नर 41 वेळा हे साध्य करू शकला होता.
धावांचा पाठलाग करताना 50 हून अधिक धावा करण्याच्या बाबतीतही कोहली अव्वल ठरला आहे. त्याने 21 वेळा ही कामगिरी करत David Warner आणि Shikhar Dhawan यांना मागे टाकले आहे. याचबरोबर आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या ओपनरमध्येही कोहलीने आघाडी घेतली असून त्याने 182 षटकारांसह KL Rahul ला मागे टाकले आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सर्वाधिक 874 धावा करण्याचा विक्रमही कोहलीच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम Sanju Samson याच्या नावावर होता. तसेच 150 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने सर्वाधिक वेळा धावा करण्याचा विक्रमही कोहलीने आपल्या नावावर नोंदवला असून त्याने Rohit Sharma ला मागे टाकले आहे.
आयपीएलमध्ये 50 पेक्षा जास्त धावा करण्याच्या खेळींची संख्या आता कोहलीची 72 वर पोहोचली असून त्याने अवघ्या 260 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्यामुळे या हंगामात कोहलीचा फॉर्म प्रतिस्पर्धी संघांसाठी मोठे आव्हान ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



