Home क्रीडा आयपीएल 2026 : DRS नियमात क्रांतिकारी बदल ; बीसीसीआयचा निर्णय 

आयपीएल 2026 : DRS नियमात क्रांतिकारी बदल ; बीसीसीआयचा निर्णय 


मुंबई – वृत्तसेवा । आयपीएल 2026 स्पर्धेत निर्णय पुनरावलोकन प्रणाली (DRS) संदर्भात बीसीसीआयने मोठा आणि परिणामकारक बदल लागू केला असून, या निर्णयामुळे सामन्यादरम्यान संघांकडून केली जाणारी ‘चालाखी’ आता पूर्णपणे थांबणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आलेल्या या नियमाची अंमलबजावणी आता प्रत्यक्ष सामन्यांमध्ये सुरू झाली असून, यामुळे निर्णय प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार आहे.

आयपीएल 2026 चे दोन सामने यशस्वीरीत्या पार पडले असून तिसऱ्या सामन्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काही नियमांमध्ये केलेले बदल आता प्रभावीपणे लागू करण्यात येत आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा बदल डीआरएससंदर्भात आहे. याआधी संघांनी एखाद्या विशिष्ट निर्णयावर अपील केल्यावर तिसरा पंच त्या निर्णयापुरता मर्यादित न राहता इतर बाबींचाही आढावा घेत असे. यामुळे काही वेळा संघांना अप्रत्यक्ष फायदा मिळत असल्याचे दिसून आले होते. बीसीसीआयने याची दखल घेत या नियमात बदल करत ‘चालाखी’ला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.

नव्या नियमांनुसार, आता डीआरएस अपील ज्या कारणासाठी करण्यात येईल, तिसरा पंच केवळ त्याच मुद्द्याची तपासणी करणार आहे. उदाहरणार्थ, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने झेलबाबत अपील केल्यास टीव्ही पंच फक्त झेल वैध आहे की नाही हेच तपासतील. यापूर्वी अशा वेळी बॉल बॅटला लागला का किंवा चेंडू वाईड होता का, यासारख्या इतर बाबींचाही विचार केला जात होता. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत गोंधळ निर्माण होत होता.

फलंदाजाला जर वाटत असेल की चेंडू बॅटला लागलेला नाही किंवा तो वाईड आहे, तर त्याला स्वतंत्र अपील करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र, यासाठी फलंदाजाला केवळ 15 सेकंदांचा कालावधी देण्यात येणार आहे. एकदा टीव्ही पंचांनी अंतिम निर्णय दिल्यानंतर दुसऱ्या अपीलसाठी कोणतीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही. त्यामुळे खेळ अधिक वेगवान आणि स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

क्रिकबझच्या माहितीनुसार, आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी झालेल्या बैठकीत सर्व 10 संघांच्या कर्णधारांना या बदलांची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे सर्व संघांना या नव्या नियमांची पूर्वकल्पना होती आणि त्यांनी त्यानुसार आपली रणनीती आखली आहे.

दरम्यान, खेळाडूंच्या सुरक्षिततेसंदर्भातही बीसीसीआयने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एखाद्या खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाल्यास त्याला बदलण्याची परवानगी देण्यात येईल. मात्र, हा बदल ‘इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट्स’ म्हणून आधी निवडलेल्या पाच खेळाडूंमधूनच करावा लागेल. यष्टीरक्षकाला दुखापत झाल्यास संघातील इतर खेळाडूला ही जबाबदारी दिली जाईल. विदेशी खेळाडूच्या बाबतीत, संघात आधीच तीन विदेशी खेळाडू असतील तरच दुसऱ्या विदेशी खेळाडूला संधी दिली जाईल, अन्यथा भारतीय खेळाडू मैदानात उतरवला जाईल.


Protected Content

Play sound