मुंबई वृत्तसंस्था । आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने ११ हंगामांमध्ये ३ विजेतेपदे जिंकली आहेत. विशेष म्हणजे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याचे विजयात मोठे योगदान आहे. त्यामुळे मुंबईने अनेक धडाकेबाज सामने जिंकून आयपीएलमध्ये आणि चाहत्यांच्या मनामध्ये आपली एक वेगळी जागा तयार केली आहे. यंदाच्या वर्षीदेखील मुंबईच्या संघ आयपीएलमध्ये जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. मुंबईच्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा याने एक महत्वाचा आणि मोठा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये उत्तम खेळ खेळत आहोत. पण तुम्हाला तुमच्या तंदुरुस्तीकडे लक्ष देणेदेखील तितकेच गरजेचे असते. जर मला विश्रांतीची गरज भासली, तर मी नक्कीच विश्रांती घेईन असे रोहित शर्मा यांनी सांगितले.
गेल्या काही हंगामात मुंबईच्या संघाची मधली फळी काहीशी कमकुवत दिसून आली. त्यामुळे रोहित शर्माने स्वतःला सलामीवीर न खेळवत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस ढकलले होते. पण आता मुंबईच्या ‘हिटमॅन’ने महत्वाची घोषणा केली आहे. युवराज सिंग याला संघात घेण्यात आले आहे. त्याशिवाय इतरही काही खेळाडूंची गेल्या वर्षभरातील कामगिरी चांगली झाली आहे. त्यामुळे रोहितला काहीसा दिलासा मिळाला असून रोहित शर्मा IPL मध्ये सलामीवीर म्हणूनच फलंदाजीस येणार आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. या वर्षीच्या सर्व सामन्यांमध्ये मी सलामीवीर म्हणून फलंदाजीसाठी येणार आहे. आमच्या संघात अनुभवी आणि नव्या दमाच्या खेळाडूंचा चांगला समतोल आहे. परदेशी खेळाडूंनी आतापर्यंत बऱ्याच हंगामात आम्हाला सामने जिंकवून दिले आहेत, पण आमचा मूळ हेतू हा संघातील ७ भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली व्हावी, हाच असेल, असे रोहितने स्पष्ट केले.