मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेते तथा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून आज चौकशी सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार जोशी यांचा जबाब इडीने नोंदवून घेतला आहे. दरम्यान, याच प्रकरणी मनसे अध्य्यक्ष राज ठाकरे यांची देखील चौकशी होणार आहे.
आज उन्मेष यांची चौकशी सुरु आहे. या प्रकरणी याआधीच ईडीने कोहिनूर सीटीएनएलच्या एका बड्या अधिकाऱ्याचा जबाब नोंदवला आहे. उन्मेष जोशी आणि अन्य दोन व्यावसायिकांनी मिळून भागिदारीत व्यवसाय सुरू केला होता. यात आयएलएफएस या संस्थेने २२५ कोटींची गुंतवणूक केली होती. मात्र २००८ मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान सोसत कंपनीने आपले समभाग केवळ ९० कोटी रूपयांना विकले होते. समभाग विकल्यावरही आयएलएफएसने कोहिनूर सीटीएनएल या इमारतीसाठी अगाऊ कर्ज दिले. मात्र या कर्जाचा परतावा कोहिनूरने न केल्याचे सांगितले जाते आहे. त्यानंतर २०११ मध्ये कोहिनूर सिटीएनएल कंपनीने आपली काही मालमत्ता विकून ५०० कोटींच्या कर्जाचा परतावा करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. या करारानंतर आयएलएफएसने कोहिनूरला १३५ कोटींचे कर्ज दिल्याचे ईडीचे म्हणणे आहे.