मोहराळा ग्रामपंचायतीतील निकृष्ठ कामांची चौकशी करा; भीम आर्मी एकता मिशनची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील मोहराळा हरीपुरा ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून तसेच इतर योजनांअंतर्गत झालेल्या निकृष्ठ प्रतीच्या विकास कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भीम आर्मी एकता मिशनचे गौरव सोनवणे यांनी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गौरव सोनवणे यांनी पंचायत समितीला दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे की, मोहराळा ग्रुप ग्रामपंचायतीच्या २०२१ ते २०२३ या कार्यकाळात सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने १५व्या वित्त आयोगाचा निधी तसेच इतर शासकीय निधीतून गावात केलेली सर्व विकास कामे अत्यंत निकृष्ठ दर्जाची आहेत. या कामांची तातडीने चौकशी आणि ऑडिट करून सरपंच व ग्रामसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, अशा निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकावे, असेही त्यांनी सुचवले आहे.

भीम आर्मी एकता मिशनच्या वतीने गौरव भरत सोनवणे, फिरोज अब्बा तडवी आणि राहुल जयकर यांनी ही मागणी लावून धरली असून, गटविकास अधिकाऱ्यांनी या संपूर्ण भ्रष्ट कारभाराची चौकशी न केल्यास त्यांची मूक संमती आहे असे समजून वरिष्ठ पातळीवर या भ्रष्टाचाराची तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या निवेदनामुळे ग्रामपंचायतीतील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, येत्या काळात याप्रकरणी काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Protected Content