मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणात सर्व संबंधितांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडून जोर धरू लागली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरही हे प्रकरण संपणार नसल्याचे स्पष्ट करत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
शेकडो महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर दबाव वाढला होता. अखेर त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, या एका राजीनाम्याने संपूर्ण प्रकरणावर पडदा पडू शकत नाही, असे स्पष्ट मत वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले.

या प्रकरणात काही मंत्री आणि अधिकाऱ्यांची नावे समोर येत असल्याचा दावा करत गायकवाड यांनी “अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणारे मंत्री नेमके कोण?” असा थेट सवाल उपस्थित केला. अशा सर्व व्यक्तींवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा पीडित महिलांना न्याय मिळणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. खरातला वाचवण्यासाठी कोणी प्रयत्न केले असतील, त्यांनाही कायद्याच्या कक्षेत आणले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
भोंदूबाबा अशोक खरातच्या कारवायांमुळे अनेक महिला लैंगिक आणि आर्थिक शोषणाची बळी ठरल्याचा आरोप करत गायकवाड यांनी राज्यातील अंधश्रद्धा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजकीय पाठबळामुळे अशा व्यक्ती निर्भयपणे फसवणूक करतात, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. पुरोगामी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात अशा घटना घडणे चिंताजनक असल्याचे सांगत त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याचीही आठवण करून दिली.
सरकारने या प्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी सुरू केली असली तरी मंत्रिमंडळातील संबंधितांवर ठोस कारवाई झाल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असेही गायकवाड म्हणाल्या. त्यांनी राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित करत रुपाली चाकणकर यांच्या कार्यकाळावर टीका केली. महिलांना संरक्षण देण्याऐवजी त्यांना अधिक अडचणीत आणल्याचा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्याचा उल्लेख करत गायकवाड यांनी अशोक खरात प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, असा धडा देण्याची गरज व्यक्त केली.



