जळगाव, प्रतिनिधी । जामनेरातील व्यापारी संकुल घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारच्या ग्राम विकास खात्याने नेमलेली समिती आज जिल्हा परिषदेत दाखल झाली आहे. या समितीच्या अध्यक्षांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जि. प. सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी भेट घेऊन या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
जामनेर येथील जिल्हा परिषद मालकीचे भूखंड अंतर्गत बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर विकसित करणे कामी विकासकाला दिलेल्या कामांमध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी समितीचे अध्यक्ष मनिष सांगळे यांना केली आहे.
जामनेर जिल्हा जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या भूखंडावर विकासकाने शासन मान्यतेच्या व्यतिरिक्त कोणतीही बदलाची परवानगी न घेता गाळेबांधकाम करून अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये विकून जवळ जवळ करोडो रुपयांचा घोटाळा करून भ्रष्टाचार केला आहे. तसेच गाळे बांधकाम करताना शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे भाडेपट्टा न भरता शासनाची दिशाभूल केली आहे. तसेच जिल्हा परिषदेची मराठी व उर्दू शाळेचे बांधकाम मंजूर ठिकाणी न करता दुसऱ्या भूखंडावर बांधकाम केले आहे. तसेच मंजूर भूखंडावर व नगरपालिकेच्या भूखंडावर आपल्या मर्जीने बांधकाम करून वाणिज्य वापरासाठी शासन निर्णय धाब्यावर बसून विक्री केली आहे. या संपूर्ण प्रकरणांमध्ये विकासका बरोबर महाराष्ट्राच्या एका माजी मंत्री यांचा सहभाग आहे तरी आपणास विनंती आहे की आपण निपक्षपातीपणे चौकशी करून गुन्हे दाखल करावे व या बाबतीत फौजदारी कारवाई करावी अशी मागणी रवींद्र नाना पाटील यांनी केली आहे. सहाय्यक आयुक्त व चौकशी समिती अध्यक्ष मनिष सांगळे व समिती सदस्य सचिव यांना निवेदन देतांना विद्यार्थी जळगावचे तालुका अध्यक्ष धवल पाटील , महानगर उपाध्यक्ष अमोल कोल्हे उपस्थित होते.