जळगाव,प्रतिनिधी | “संसारात तडजोडीला फार महत्त्व असते. वैवाहिक जीवनाची यशस्विता देखील तडजोडीवरच अवलंबून असते. त्यामुळे सुखी संसाराचा तडजोड हाच आधार असल्याने अशा वधू- वर परिचय मेळाव्यांमध्ये तडजोड करूनच विवाह जुळवावेत’, असे प्रतिपादन महापौर सीमा भोळे यांनी केले.
अखिल भारतीय श्री क्षत्रिय शिंपी मध्यवर्ती संस्थेशी संलग्न असलेल्या येथील शिंपी समाज हितवर्धक संस्थेतर्फे आयोजित राज्यव्यापी वधू-वर परिचय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
शहरातील बालगंधर्व खुल्या नाट्यगृहात आज झालेल्या या मेळाव्याला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मेळाव्यात ३०० मुले व २२६ मुलींनी आपला परिचय करून दिला. समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील निकुंभ (नाशिक) अध्यक्षस्थानी होते. समाजातील दानशूर विजय खैरनार (छडवेल) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. शहर हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप, स्वागताध्यक्ष शरद बिरारी, स्वागत कार्याध्यक्ष मुकुंद मेटकर, विश्वस्त दिलीप भांडारकर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कापुरे, उपाध्यक्ष अनिल खैरनार, उद्योजक मदन पवार, राष्ट्रीय निधी संकलन प्रमुख पी. टी. शिंपी, माजी महिला अध्यक्षा अरुणा कापडणे, ऍड. संजय शिंपी, अंजना जगताप, माजी समाजाध्यक्ष डी. व्ही. बिरारी, विजय बिरारी, राष्ट्रीय युवा अध्यक्ष योगेश निकुंभ, राष्ट्रीय महिला अध्यक्षा हर्षदा बोरसे, माजी युवा अध्यक्ष पुरुषोत्तम शिंपी, सहसचिव वनेश खैरनार, राष्ट्रीय युवक कार्याध्यक्ष प्रमोद शिंपी (चाळीसगाव) यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.महापौर भोळे यांनी सांगितले, की वधू- वरांची निवड करताना श्रीमंती किंवा नोकरीच्या मागे लागू नका. विवाह जुळवताना तर पत्रिकेवरही विश्वास ठेवू नका. होणाऱ्या सासू सासऱ्यांना आई-वडील म्हणून पाहा. चंद्रकांत जगताप यांनी प्रास्ताविकात संस्था ७५ वर्षाकडे वाटचाल करीत असल्याचे सांगून संस्थेने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे यांनी या मेळाव्यात सोशल मीडियाचा वापर करून कमी कालावधीत ९३५ वधू-वरांचे फॉर्म जमा झाल्याचे सांगितले. समाजात घटस्फोटीतांचे वाढलेले प्रमाण चिंताजनक असल्याने सहजीवनाचा अभ्यास करून आयुष्य मंगलमय करावे, अशा शुभेच्छा दिल्या. विजय बिरारी यांनी मुलींच्या पालकांनी “आम्ही बघू, पाहू, सांगू’ असे सांगून वेळ वाया घालवू नये. समाजातील टेलर काम करणाऱ्यांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले. मुकुंद मेटकर यांनी मुलींच्या वडिलांनी आज आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे सांगून नोकरदारांची परिस्थिती सध्या चांगली नसल्याने चांगले शिवणकाम करणाऱ्यांनाही मुली द्याव्यात, अन्यथा पश्चात्तापाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले. शरद बिरारी यांनी मोबाईलमुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याचे सांगून चांगल्या गोष्टींसाठी मोबाईलचा वापर करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात सुनील निकुंभ यांनी सांगितले, की समाजात घटस्फोट होऊ नये म्हणून सामाजिक न्यायदान मंडळ असून, या मंडळाद्वारे समुपदेशन करण्याचे प्रयत्न होत असतात. खरे तर अशा मंडळाची गरजच नसावी, असे सांगून वधू- वर परिचय मेळावा वर्षातून एकदाच घेण्याचे आवाहन केले. मेळाव्यासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या दात्यांचा गौरव करण्यात आला. मेळाव्यापूर्वी गायत्री मंदिरापासून श्री संत नामदेव महाराजांची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत समाजाच्या महिला मंडळांच्या सदस्या एकाच पेहरावात सहभागी झाल्या होत्या. ललित खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वितेसाठी हितवर्धक संस्थेचे सचिव चंद्रकांत जगताप, मेळावा स्वागत सचिव मनोज भांडारकर, संजय जगताप, दीपक जगताप, प्रशांत कापुरे, चेतन खैरनार, दिलीप सोनवणे, नथ्थू शिंपी, चेतन पवार, प्रमोद कापुरे, प्रशांत सोनवणे, सुरेश सोनवणे, सुजित जाधव यांच्यासह स्वागत समिती सदस्य व समाजबांधवांचे सहकार्य लाभले.
गणेश वंदना ठरली कार्यक्रमाचे आकर्षण
कार्यक्रमात सुरवातीला समाजातील प्रियदर्शिनी भांडारकर, प्रांजल जगताप व अनुष्का जगताप या विद्यार्थिनींनी गणेश वंदना सादर केली. तिघींच्या नृत्याविष्काराला उपस्थित समाजबांधवांची प्रचंड दाद मिळाली. हे सादरीकरण झाल्यानंतर त्यांच्यावर रोख स्वरूपातील बक्षिसांचा जणू वर्षावच झाला. महापौर सीमा भोळे यांच्यासह उपस्थित अनेक पदाधिकारी व समाजबांधवांनी या तिघांना बक्षिसे देऊन त्यांचे कौतुक केले.