पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी | येथून जवळच असलेल्या सांगवी येथे गेल्या तीन दिवसांपुर्वी झालेल्या अतीवृष्टी सदृश पावसामुळे गोगडी नदीच्या पुरात शेतकऱ्यांच्या उभी पिकांसह जमीन वाहून गेल्याचे व्हिडिओसह वृत्तांकन ‘लाईव्ह ट्रेन्डस न्युज’ने केले होते. या वृत्ताची दखल घेत आज मंगळवार ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत शासकीय नियमाप्रमाणे सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल असे प्रतिपादन केले.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच दोन नोव्हेंबर रोजी सांगवीसह परिसरात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे गोगडी नदीला आलेल्या पुराने नदी किनार्या लगतच्या अमोल सुधाकर घोंगडे, विलास चिंधूबा लहासे, भिका लक्ष्मण घोंगडे, हितेंद्र जाधव, सुदाम राऊत यांच्यासह शेतकऱ्यांच्या उभी पिकांसह शेतजमिनी वाहून गेल्या. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांनी शेताच्या बांधावर येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शासकीय निकशाप्रमाणे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याचे सांगितले. ज्या शेतकऱ्यांचा पीकविमा नाही त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत मदत दिली जाणार आहे. काही शेतकऱ्यांच्या विहीरी ढासळल्या आहेत. त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश डाॅ ढाकणे यांनी दिले. यावेळी पहूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेश सिंग परदेशी, तलाठी सुनील राठोड, माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, माजी सरपंच लक्ष्मण गोरे, रामेश्वर पाटील, शंकर घोंगडे, अरविंद देशमुख, यांच्यासह ग्रामस्थ, पदाधिकारी, तसेच शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.