पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या आखाड्यात भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावत सुवर्णपदक पटकावणाऱ्या खान्देशच्या सुपुत्र पैलवान हितेश अनिल पाटील यांचे पाचोरा शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. थायलंडमधील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर २१ जानेवारी रोजी ढोल-ताशे, डीजेच्या तालावर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले.

बँकॉक, थायलंड येथे इंटरनॅशनल ऑलिम्पिक स्पोर्ट ऑर्गनायझेशन कमिटीच्या मान्यतेने आयोजित इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप २०२६ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत हितेश पाटील यांनी भारतासाठी सुवर्णपदक पटकावले. या यशाचा गौरव करण्यासाठी पाचोरा शहरातून काढण्यात आलेली मिरवणूक जामनेर रोडवरील प्रभु श्रीराम मंदिरातील व्यायामशाळेपासून सुरू झाली. चारचाकी वाहनावर भारताचा तिरंगा फडकवत आई-वडिलांसह बसलेले हितेश पाटील हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

प्रभु श्रीराम मंदिर, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वे भुयारी मार्ग, राजे संभाजी महाराज चौक या प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. या दरम्यान तरुणांनी कसरती सादर केल्या, तर आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि कुस्तीप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजे संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करून हितेश पाटील यांनी अभिवादन केले.
मलेशिया, थायलंड, श्रीलंका आणि भारत या देशांच्या सहभागाने पार पडलेल्या या स्पर्धेत भारताच्या संघाने मिशन ओलंपिक गेम्स असोसिएशन इंडिया यांच्या वतीने सहभाग नोंदवला होता. बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेतून निवड झालेल्या खेळाडूंमधून १२५ किलो वजनगटासाठी जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र पै. हितेश अनिल पाटील यांची निवड झाली होती. वरिष्ठ गटात भारताचे प्रतिनिधित्व करत त्यांनी अत्यंत चुरशीच्या अंतिम लढतीत थायलंडच्या बलाढ्य पैलवानावर मात करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
ताकद, तांत्रिक कौशल्य, संयम आणि अचूक रणनीती यांचा उत्कृष्ट मिलाफ दाखवत हितेश पाटील यांनी हा सामना जिंकला. महाराष्ट्र केसरीसाठी जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सुवर्णविजेता ठरला असून त्यामागे त्यांची सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे.
आशियाई सुवर्णपदक विजेते तसेच मिशन ओलंपिक गेम्स असोसिएशन इंडिया चे सरचिटणीस प्रा. पै. अमोल साठे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनामुळे संघाला योग्य तयारी, आत्मविश्वास आणि यशाची दिशा मिळाली असून भारतीय कुस्तीपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
पाचोरा तालुक्यातील शेतकरी कुटुंबातून आलेले पै. हितेश पाटील हे पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती तसेच पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अनिल धना पाटील (गाळण) यांचे सुपुत्र आहेत. पाचोरा येथील एम. एम. महाविद्यालय आणि पत्रकार संदीप महाजन संचलित ध्येय करिअर अकॅडमीचे ते विद्यार्थी राहिले असून जामनेर रोडवरील श्रीराम मंदिर परिसरातील महावीर व्यायाम शाळेत त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले. याच आखाड्यात त्यांनी स्वतःला घडवले आणि दोन वर्षे कुस्ती कोच म्हणूनही अनेक नवोदित मल्लांना मार्गदर्शन केले आहे.



