Home Cities यावल बाल संस्कार विद्या मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात 

बाल संस्कार विद्या मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्त्रीशक्तीवर आधारित कविता, नाटिका, गाणी आणि भाषणांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. शाळेच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सविता वारके होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सुनिल माळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पंढरीनाथ महाले यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट करत समाजात महिलांचे असलेले महत्त्वपूर्ण स्थान आणि विविध क्षेत्रांतील त्यांचे योगदान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता पहिलीच्या नारायणी येवले, संचिता सोनवणे आणि लावण्या बारी यांनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारली. तसेच माही सोनवणे हिने भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची वेशभूषा सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी स्त्री सन्मान आणि स्त्रीशक्ती या विषयांवर आधारित नाटिका, कविता, गाणी आणि भाषणे सादर करून कार्यक्रमाला विशेष अर्थपूर्ण स्वरूप दिले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि समाजात स्त्री सन्मानाचा संदेश देण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षिका आणि महिला कर्मचारी वर्ग यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन शिवशंकर सोळंकी यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी अतुल पवार यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम अत्यंत आनंददायी वातावरणात पार पडला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound