Home महिला जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात 

जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महिला सशक्तीकरणाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना महिलांचे समाजातील महत्त्व आणि त्यांचे योगदान याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या सौ. रंजना महाजन यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केली. यावेळी इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या दिपाली धांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. गौरी भिरूड आणि श्रीमती राजश्री लोखंडे यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

कार्यक्रमादरम्यान प्राचार्या सौ. रंजना महाजन यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत महिलांचे समाजातील स्थान, त्यांची जिद्द आणि कर्तृत्व याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. महिलांनी शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना महिलांचा सन्मान राखण्याचे आणि त्यांच्या प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मनीषा पाटील यांनी केले. यावेळी सौ. पूनम कोळंबे यांनी विद्यार्थ्यांना जागतिक महिला दिनाचा इतिहास, त्यामागील उद्देश आणि महिलांच्या हक्कांबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये महिला सशक्तीकरणाबाबत जागरूकता निर्माण झाली.

कार्यक्रमाच्या शेवटी सौ. वैशाली अडकमोल यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.


Protected Content

Play sound