Home Cities जळगाव विश्व हिंदू परिषदेची आंतरराष्ट्रीय बैठक जळगावात होणार !; पत्रकार परिषदेत माहिती

विश्व हिंदू परिषदेची आंतरराष्ट्रीय बैठक जळगावात होणार !; पत्रकार परिषदेत माहिती


जळगावलाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी विश्‍व हिंदू परिषद केंद्रीय प्रन्यासी मंडळ आणि केंद्रीय प्रबंध समितीची आंतरराष्ट्रीय स्तराची बैठक यावर्षी जळगावात आयोजित करण्यात आली आहे. मागील ६१ वर्षांच्या इतिहासात महाराष्ट्रात ही बैठक केवळ तीन वेळा (पुणे, मुंबई आणि नागपूर) झाली आहे, आणि विशेष म्हणजे ही बहुतांशी मेट्रो शहरांमध्येच होते. त्यामुळे पहिल्यांदाच जळगावसारख्या शहराला या बैठकीचा मान मिळाल्याने हा जिल्ह्यासाठी एक मोठा सन्मान मानला जात आहे. अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे यांनी बुधवार १६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता पत्रकार परिषदेत दिली.

एमआयडीसी परिसरातील बालाणी लॉन्स येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी देशभरातून आणि पाच वेगवेगळ्या देशांमधून असे एकूण सुमारे ३०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये विहिंपचे अध्यक्ष अलोक कुमार, राष्ट्रीय महामंत्री बजरंग लालजी बागडा, संघटन महामंत्री मिलिंद परांडे आणि अयोध्या येथील श्रीराम मंदिर न्यास सचिव चंपतराय यांसारखे अनेक केंद्रीय पदाधिकारी आणि महत्त्वाचे संघटनात्मक व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

पाच दिवसांच्या या बैठकीदरम्यान प्रतिनिधींची निवासी व्यवस्थाही बालाणी लॉन्स येथेच करण्यात आली आहे. बैठकीच्या नियोजनासाठी भोजन, निवास, यातायात, वैद्यकीय सेवा अशा विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत, ज्यात सुमारे ७५ कार्यकर्ते कार्यरत आहेत. या बैठकीत विहिंपच्या आतापर्यंतच्या कामांचे चिंतन केले जाईल, तसेच भविष्यातील कार्याची दिशा आणि नियोजन निश्चित केले जाईल. जळगावमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधींचे आगमन ही शहरासाठी एक ऐतिहासिक बाब आहे.


Protected Content

Play sound