मुंबई प्रतिनिधी । ‘तंदुरुस्त भारत-फिट इंडिया’ या देशभर सुरू झालेल्या चळवळीचा भाग म्हणून महाराष्ट्र पोलिसांतर्फे येत्या 9 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आलीय. पोलिस दलांची आरोग्य सुधारणा तसेच युवा पिढीचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे, असा निर्णय देशातील सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांच्या परिषदेत नुकताच घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र पोलिस दल देशात प्रथमच हा उपक्रम राबवित आहे. ही सर्व माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी दिली.
देशात प्रथमच पोलिसांतर्फे आयोजित होणाऱ्या या मॅरेथॉनच्या वेबसाईटचे उद्घाटन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या हस्ते आज करण्यात आले. पोलीस आणि जनतेमध्ये जवळीक वाढावी, त्यांच्यामध्ये संवाद वाढावा यादृष्टीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून वेबसाईटवर नोंदणी करुन लोकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी यावेळी केले. पोलीस मुख्यालयात बुधवारी या मॅरेथॉनसंदर्भातील जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
गेट वे ऑफ इंडिया ते वांद्रे सी लिंक अशी ही मॅरेथॉन असेल. स्वास्थ्यदायी दौड अशी या मॅरेथॉनची संकल्पना आहे. ही मॅरेथॉन ४२ किलोमीटर, एकवीस किलोमीटर, 10 मैल व 5 किलोमीटर या प्रकारांमध्ये होणार आहे. धावपटूंना आकर्षक बक्षिसेही देण्यात येणार आहेत. या मॅरेथॉनमध्ये भारतभरातून तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुमारे 15 हजार धावपटू सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. मॅरेथॉनमध्ये 5 हजार पोलीस सहभागी होणार आहेत.
मॅरेथॉनसंदर्भात जनजागृती करण्यासाठी 2 फेब्रुवारी रोजी 18 वर्षांवरील 300 सायकलपटूंच्या सहभागाने पनवेल, कल्याण, मीरा-भाईंदर येथून कुलाबा येथील पोलिस मुख्यालयापर्यंत सायकलफेरी काढण्यात येणार आहे. तसेच 31 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 वाजता महिलांची शक्ती आणि सुरक्षितता याचा संदेश देत महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये महिला दौडचेही आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी अपर पोलीस महासंचालक प्रशासक संजीव सिंघल, ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला, नवभारत टाइम्सचे संपादक सुंदरचंद ठाकूर, अलाईड डिजीटलच्या संचालक शुभदा जहागिरदार आदी मान्यवर उपस्थित होते.