रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अनुदानित आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु, ता. अमळनेर, जि. जळगाव येथे दि. १५ जानेवारी २०२५ रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी घोषणा केली की, विज्ञान प्रदर्शनातील विजेत्या विद्यार्थ्यांना इस्रो दौऱ्यावर नेले जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल व त्यांना प्रेरणा मिळेल.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायट जळगावचे प्राचार्य अनिल झोपे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय स्टेट बँक जळगावचे क्षेत्रीय व्यवस्थापक धर्मेंद्रकुमार सिंग व पिंपळे आश्रमशाळेच्या अध्यक्षा विद्या युवराज पाटील उपस्थित होत्या. शाश्वत आदिवासी भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयावर आधारित या विज्ञान प्रदर्शनात जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांनी सहभाग नोंदविला. उच्च प्राथमिक गटातून शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लालमातीच्या सिकलसेल नियंत्रण मॉडेल ला द्वितीय क्रमांक मिळाला. या मॉडेलच्या साहाय्याने आदिवासी समाज व डोंगराळ भागातील सिकलसेल आजाराचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
शाळेचे मुख्याध्यापक मनेश तडवी व पदवीधर शिक्षक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विन सुनील बारेला व दीपक सखाराम पावरा या विद्यार्थ्यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. मॉडेल तयार करण्यासाठी विज्ञान शिक्षक प्रशांत सैंदाणे व आशिष पाटील यांनी विशेष सहकार्य केले. प्रकल्प कार्यालय यावलचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पी. पी. माहुरे, राजेंद्र लवणे, पवन पाटील, संदीप पाटील तसेच कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास गायकवाड, मिलिंद पाईकराव, एल. एम. पाटील व मीनाक्षी सुलताने यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या यशामुळे लालमाती आश्रमशाळेचा गौरव झाला आहे.