जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधासाठी घ्यावयाची काळजी याविषयी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारे कोरोनाबाबत हयगय करू नये अशा सूचना अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी दिल्या.
शहरात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना आजाराने ग्रस्त असणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना सकाळी तासिकेवेळी विविध सूचना दिल्या.
विद्यार्थ्यांनी मास्क कायम वापरावा. बोलण्यासाठी दोन जणांत ३ फुटांचे तरी अंतर ठेवा. वारंवार हात स्वच्छ करीत राहा. एकत्र जेवणाला, नाश्ता करायला, चहा पिण्याला बसू नका. अन्यथा अंतर ठेऊन जेवावे. लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या, असे आवाहनदेखील अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. अरुण कसोटे, डॉ. इमरान तेली, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. संजय गायकवाड उपस्थित होते.