मुंबई प्रतिनिधी | फडणवीस सरकारच्या काळात विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केल्या प्रकरणाची आता तीन सदस्यीय समितीकडून चौकशी करण्यात येणार आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्या आणि शेवटच्या दिवशी फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा चांगलाच गाजला. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळात यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. २०१६-१७ मध्ये राज्यातील आमदार खासदारांचे फोन टॅप करण्यात आले होते. समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले, यासाठी माझा फोन नंबर अमजद खान नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी सभागृहात केली.
दरम्यान, यावर फोन टॅपिंग करणे हा गंभीर प्रकार असून अशा प्रकरणात रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे. परंतु तशी प्रक्रिया या प्रकरणात पार पाडल्याचे दिसत नाही. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. उच्चस्तरीय अधिकार्यांची बैठक घेऊन याची माहिती घेऊ, असे आश्वासन गृहमंत्री दिली वळसे पाटील यांनी सभागृहाला दिले होते. या अनुषंगाने आता फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करेल. चौकशीनंतर तीन महिन्यात अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.