जळगाव प्रतिनिधी । इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलतर्फे रिंग रोड परिसरातील यशवंतनगरात इनरव्हील बोटॅनिकल फॉरेस्ट गार्डन साकारले असून यात 300 औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण केले.
या ठिकाणी नागरिकांना शांततेत बसता यावे, त्यांना ताजी व शुद्ध हवा मिळावी, यासाठी बेंचेस देखील प्रदान करण्यात आले. भविष्यात हे अनोखे गार्डन आयुवैदीक औषधींसह शुद्ध ऑक्सिजनसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या औषधी व जास्तीत जास्त ऑक्सिजन देणार्या वनस्पतींच्या रोपांचे सर्वांनी संवर्धन करावे. इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलचा हा पर्यावरणासाठीचा आगळा-वेगळा जळगाव पॅटर्न ठरावा. या उपक्रमापासून इतरांनी प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा हा पॅटर्न राबवावा, असे मत माजी महापौर सीमा भोळे, भाजपाच्या दिप्ती चिरमाडे, महानगरपालिकेचे अभियंता योगेश वाणी यांच्यासह अन्य मान्यवरांनी वृक्षारोपण आणि बेंचेस प्रदान कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत तुळशीचे रोप देऊन करण्यात आले.
या उपक्रमाची माहिती क्लबच्या डिस्ट्रीक्ट चेअरमन अश्विनी गुजराथी, आयपीडीसी व कोषाध्यक्ष मीनल लाठी, पीडीसी व पृथ्वी समन्वयक संगीता घोडगावकर, प्रमुख नेहा संघवी, सचिव इशिता दोशी आदींनी दिली. या वेळी सीसी गुंजन कथुरिया, कोषाध्यक्ष नेहा नैनानी, सीसीसीसी डॉ.सिमरनकौर जुनेजा, सदस्या गायत्री कुलकर्णी, पूजा भागवाणी, मोना गांधी, रोशनी चुग, नफिसा लेहरी आदी उपस्थित होते.
या रोपांचे केले वृक्षारोपण
या गार्डनमध्ये अजवाईन, अडुलसा, अर्जुन, बकुल, कडूनिंब, औदुंबर, नीलगिरी, वटवृक्ष, पिंपळ, विविध प्रकारच्या तुळशी, कोरफड, लिंबू गवत, पांढरा चंदन, लाल चंदन, पानरुती, पारिजात, गुलमोहर, समुद्र-समान, जिओई, मधुमालती आदीचे वृक्षारोपण करण्यात आले.