पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तरूणी गतीमंद असल्याचा गैरफायदा घेत झालेल्या अत्याचारातून तीन महिन्याची गर्भवती असल्याचा संतापजनक प्रकार पाचोरा तालुक्यात उघडकीला आला आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलीसांनी अटक केली असून पाचोरा पोलीस ठाण्यात ॲट्रासीटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावात मागासवर्गीय समाजातील २२ वर्षीय गतीमंद तरूणी ही आपल्या वृध्द आईसोबत वास्तव्याला आहे. त्याच्या गावात राहणारा ज्योतीराम पांडूरंग पाटील (वय-२५) याने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मध्यरात्री तरूणीची आई झोपलेली असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचाराचा नित्यक्रम सुरू केला होता. वृध्द महिलेच्या घराच्या बाजूला तिचे नातेवाईक राहतात. त्यांनी दोन महिन्यापूर्वी ज्योतीराम पाटील दुष्कृत्य करतांना रंगेहात पकडले होते.
याबाबत गावातील प्रतिष्ठीत नागरीकांतर्फे त्याला समज देण्यात आली होती. त्यानंतर पोळ्याच्या आदल्या दिवशी पिडीत तरूणी व तिची आई या दोघेजण आजारी पडल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या नातेवाईक तरूणाने त्यांनी पाचोरा तालुक्यातील गिरड येथील ग्रामीण रूग्णालयात उपारार्थ दाखल केले. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. पिडीत मुलगी ही तीन महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.
अखेर पिडीत मुलीच्या आईने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी ज्योतीराम पाटील याच्या विरोधात ॲट्रासीटी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक भरत काकडे करीत आहे.