चक्क प्रिस्क्रिप्शनवर मोदी सरकारच्या आरोग्य बजेटची माहिती !

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉक्टरांकडून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या प्रिस्क्रिप्शनच्या मागील बाजू कोरीच असते. याच संधीचा उपयोग करून भाजपा वैद्यकीय आघाडी जळगाव पूर्वचे सहसंयोजक डॉ. सुनिल पाटील, साकळीकर यांनी एक अभिनव उपक्रम राबवला आहे.

डॉ. सुनिल पाटील यांनी 2025-26 च्या मोदी सरकार -3 च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी असलेल्या ₹95,950 कोटी रुपयांच्या सविस्तर तरतुदी प्रिस्क्रिप्शनच्या मागील कोऱ्या बाजूस छापून या माहितीचा प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विमोचन

या प्रिस्क्रिप्शनचे औपचारिक विमोचन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. जळगावमध्ये जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित नमो कुस्ती महाकुंभ – 2, देवाभाऊ केसरी स्पर्धेच्या निमित्ताने हा सोहळा पार पडला. या वेळी जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे, आमदार अमोलदादा जावळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. त्यांनी ही संकल्पना अत्यंत उपयुक्त आणि नाविन्यपूर्ण असल्याचे गौरवोदगार काढले. आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रिस्क्रिप्शनवरच आरोग्य बजेटची माहिती

या प्रिस्क्रिप्शनच्या मागील बाजूस 2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रासाठी असलेल्या महत्त्वाच्या तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये खालील बाबी समाविष्ट आहेत:

₹95,950 कोटींची आरोग्य क्षेत्रासाठी तरतूद

जीवनावश्यक 36 औषधांवरील कस्टम टॅक्समध्ये सवलत

200 नवीन डे-केअर कॅन्सर सेंटरची निर्मिती

पंतप्रधान आयुष्यमान भारत योजनेसाठी ₹10,000 कोटींची तरतूद

राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी ₹37,000 कोटींची तरतूद

वैद्यकीय पर्यटनामुळे भारताचा जागतिक स्तरावर विकास

येत्या काही वर्षांत 10,000 नवीन वैद्यकीय जागा निर्माण करण्याचा निर्णय

या माध्यमातून ‘विकसित भारत @2047’ या संकल्पनेला बळकटी मिळेल, असा विश्वास डॉ. सुनिल पाटील यांनी व्यक्त केला.

उपक्रमाचा उद्देश आणि महत्त्व

डॉ. पाटील यांनी सांगितले की, सरकारकडून आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे, परंतु या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. डॉक्टरांकडून रोज हजारो रुग्णांना प्रिस्क्रिप्शन दिले जाते. जर त्याच्या मागील बाजूस सरकारच्या आरोग्य योजनांची माहिती दिली गेली, तर अधिकाधिक नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो.

या संकल्पनेद्वारे आरोग्य सेवेसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती थेट सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. आरोग्य क्षेत्रात सरकारच्या प्रयत्नांचा प्रचार करण्याच्या दृष्टीने हा एक सकारात्मक उपक्रम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपा वैद्यकीय आघाडीचा अभिनव उपक्रम

हा उपक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीदरम्यान सादर करण्यात आला. या भेटीसाठी जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन, आमदार राजुमामा भोळे आणि आमदार अमोलदादा जावळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

भाजपा वैद्यकीय आघाडीने हा उपक्रम राबवून आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या योजनांची माहिती सहजगत्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात अशा उपक्रमांमुळे आरोग्य सेवा अधिक सशक्त आणि प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Protected Content