मोरव्हाल गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी विहीरअधिग्रहण करण्याची तहसीलदारांची सूचना

abhilasha devgune tahsildar

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मोरव्हाल येथील पाणी टंचाईची दखल तहसीलदार अभिलाषा देवगुणे यांनी घेतली असून आज सकाळी पाणी टंचाईची संदर्भात महत्वाची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गावाच्या जवळपास चांगली जलपातळी असलेली विहीर अधिग्रहीत करण्याची सूचना तहसीलदार देवगुणे यांनी दिली आहे.

 

 

आदिवासी भागातील तहानलेल्या मोरव्हालची पाणी टंचाईची समस्या समोर आल्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन आज तातडीची बैठक घेतली. या बैठकीत मोरव्हाल गावाची पाणी टंचाईची समस्या कशी सोडायची याबाबत चर्चा झाली. तसेच चांगली जलपातळी असलेल्या विहिरीचे लवकरात-लवकर अधिग्रहण करण्याच्या सूचना तसिलदारांनी दिल्या. या बैठकीला पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाचे श्री.कापडे, मंडळ अधिकारी श्री.खारे, सरपंच अल्लाहुद्दीन तडवी, माजी उपसरपंच सिकंदर तडवी, पोलिस पाटील यूसुफ तडवी,ग्रामसेवक सी.व्ही.चौधरी, तलाठी श्री.बारेला आदी उपस्थित होते.

 

मोरव्हाल गावात भीषण पाणी टंचाई

आदिवासी भागातील मोरव्हाल या गावाची सुमारे दोन हजार लोकसंख्या आहे. या गावाला एप्रिलमध्येच भीषण पाणी टंचाई समस्या जाणवत आहे. गावामध्ये यापूर्वी चार ट्यूबवेल केल्या होत्या. परंतु शेकडो फुट खाली खोदूनसुध्दा पाणी लागले नाही. म्हणून गावाच्या शेजारी असलेल्या शेतातील विहीर काही महिन्यांपूर्वी अधिगृहित करण्यात आली होती. परंतू तिची पाण्याची पातळी देखील घसरल्याने आदिवासी बांधवांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

Add Comment

Protected Content