चोपडा तालुक्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चोपडा तालुक्यातील औद्योगिक विकासाला गती मिळण्यासाठी आज दिनांक १९ मार्च २०२५ रोजी मुंबई येथे मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या लेखी मागणीनुसार उद्योग मंत्री मा. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत चहाडी (ता. चोपडा) येथे औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासंदर्भातील अडचणी सोडविण्यावर सखोल चर्चा करण्यात आली.

चोपडा औद्योगिक क्षेत्रासाठी ताब्यात घेतलेल्या २०.७५ हेक्टर सरकारी जमिनीपैकी २ हेक्टर अतिक्रमित जमीन वगळून उर्वरित १८.७५ हेक्टर जमिनीवरील आराखड्यास मंजुरी देण्यात आली. सदर क्षेत्राचे सीमांकन पूर्ण झाले असून, औद्योगिक क्षेत्राच्या दरनिर्धारणाचा प्रस्ताव ११ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्यालयात सादर करण्यात आला होता. १८ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत मौजे जांबुटके (ता. दिंडोरी, जि. नाशिक) च्या धर्तीवर आदिवासी क्लस्टरचे नियोजन करून ९० दिवसांत दरनिर्धारण करण्याचे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले होते. औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसाठी १४ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास २७ मार्च २०२४ पासून मुख्यालयात सादर करण्यात आले होते. या प्रस्तावास तातडीने मंजुरी देऊन चहाडी (ता. चोपडा) येथे जलदगतीने औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.

या महत्त्वपूर्ण बैठकीस बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आमदार राजन साळवी, उद्योग विभागाचे अधिकारी कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पुलकुंडवार (सहसचिव), जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण (मुंबई), संभाजीनगरचे मुख्य अभियंता राजेंद्र गावडे, व्यवस्थापक (भूसंपादन) रागिणी ढसाळ, जळगाव प्रादेशिक अधिकारी एस. एस. घाटे, तसेच उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे हे उपस्थित होते. या निर्णयामुळे चोपडा तालुक्यातील औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल आणि स्थानिक उद्योजकांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

Protected Content