गयाना वृत्तसंस्था । वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर प्रथमच मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही वेस्ट इंडिजवर अभूत असे यश मिळविले आहे. या यशानंतर कॅप्टन कोहलीने सर्व खेळाडूचे अभिनंदन केले आहे.
प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने उभे केलेले 6 बाद 146 धावांचे लक्ष्य भारताने 19.1 षटकांत 3 बाद 150 धावा करून सहज पार केले. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 146 धावा केल्या. दीपक चहरने विंडीजच्या आघाडीच्या 3 फलंदाजांना माघारी पाठवून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण, किरॉन पोलार्ड आणि रोव्हमन पॉव्हेल यांनी खिंड लढवताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. पोलार्डने 45 चेंडूंत 1 चौकार व 6 षटकार खेचून 58 धावा चोपल्या, तर पॉव्हेलने 20 चेंडूंत नाबाद 32 धावा केल्या. चहरने 4 धावांत 3 फलंदाज बाद केले, तर नवदीप सैनीनं 2 विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवनने (3) लगेच माघारी परतला. लोकेश राहुलही 20 धावा करून बाद झाला. पण, कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंत यांनी अर्धशतकी खेळी करून संघाचा विजय पक्का केला. कोहलीनं 45 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीनं 59 धावा केल्या, तर पंतने 42 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकार खेचून नाबाद 65 धावांची खेळी केली. विंडीजच्या ओशाने थॉमसने 2 विकेट्स घेतल्या.