अहमदाबाद-वृत्तसेवा | भारतीय रेल्वेच्या तांत्रिक प्रगतीत महत्त्वाचा टप्पा गाठत देशातील पहिली लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) इंधनावर चालणारी ट्रेन अहमदाबाद येथे दाखल झाली आहे. पर्यावरणपूरक, खर्च-बचत करणारी आणि उच्च कार्यक्षमतेची ही ट्रेन भविष्यातील रेल्वे सेवांचा नवा मानदंड ठरणार असल्याचे मानले जात आहे.
या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे, एकदा पूर्ण भरलेल्या एलएनजी टाकीच्या साहाय्याने ही ट्रेन सुमारे २२०० किलोमीटर अंतर अखंडपणे पार करू शकते. त्यामुळे वारंवार इंधन भरण्याची गरज कमी होऊन वेळ आणि खर्चाची बचत होते.

सध्या गुजरातमधील मेहसाणा आणि साबरमती विभागादरम्यान या ट्रेनची चाचणी सुरू असून, आतापर्यंत तिने २००० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. चाचण्या समाधानकारक ठरल्यानंतर या विभागातील आणखी ८ ते १० गाड्यांमध्ये एलएनजी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे १४०० हॉर्सपॉवर क्षमतेची इंजिने एलएनजी इंधन प्रणालीमध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत.
अहमदाबादचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक वेद प्रकाश यांनी सांगितले की, एलएनजी हे डिझेलपेक्षा स्वस्त इंधन असल्याने रेल्वेचा ऑपरेशनल खर्च कमी होतो. तसेच एलएनजीचा वापर केल्याने कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड आणि सूक्ष्म धूलिकणांचे उत्सर्जन कमी होते, ज्यामुळे प्रदूषणात मोठी घट होण्यास मदत होते. रेल्वे ट्रॅक परिसरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासही याचा फायदा होतो.
LNG तंत्रज्ञानामुळे इंजिनच्या शक्तीत किंवा कार्यक्षमतेत कोणतीही घट होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. इंजिनची विश्वासार्हता पारंपरिक डिझेल इंजिनप्रमाणेच टिकून राहते, मात्र पर्यावरणीय दृष्टीने अधिक सुरक्षित पर्याय उपलब्ध होतो.
भारतीय रेल्वे प्रशासन भविष्यात अधिक मार्गांवर एलएनजी-चालित इंजिने सुरू करण्याच्या तयारीत असून, या उपक्रमामुळे देशातील रेल्वे सेवा अधिक हरित, किफायतशीर आणि आधुनिक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



