मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा जवळ येत असताना भारतीय सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या ९८ व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्र ठरलेल्या चित्रपटांच्या यादीत दोन भारतीय चित्रपटांनी थेट ‘बेस्ट पिक्चर’ विभागात स्थान मिळवले आहे.

Academy of Motion Picture Arts and Sciences (AMPAS) कडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, यंदा एकूण ३१७ चित्रपट ऑस्करसाठी पात्र ठरले असून त्यापैकी २०१ चित्रपट ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ (Best Picture) या प्रमुख विभागासाठी थेट पात्र ठरले आहेत. या २०१ चित्रपटांच्या यादीत ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा : अ लेजेंड – चॅप्टर 1’ आणि अनुपम खेर यांचा ‘तन्वी द ग्रेट’ या दोन भारतीय चित्रपटांचा समावेश झाला आहे.

Variety या आंतरराष्ट्रीय माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या दोन्ही चित्रपटांनी ऑस्करसाठी आवश्यक असलेले सर्वसाधारण नियमच नव्हे तर बेस्ट पिक्चर विभागासाठीचे अतिरिक्त निकषही पूर्ण केले आहेत. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हा एक ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. यामुळे यंदा ऑस्कर भारतात येण्याच्या आशा अधिक बळावल्या आहेत.
ऑस्करच्या यादीत एखादा चित्रपट समाविष्ट होण्यासाठी काही महत्त्वाचे नियम पाळणे बंधनकारक असते. संबंधित चित्रपटाने २०२५ या वर्षात अमेरिकेत किमान १० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणे आवश्यक असते आणि तो सलग किमान ७ दिवस चाललेला असावा. याशिवाय चित्रपटाच्या निर्मात्यांना Academy Representation and Inclusion Standards (RAISE) हा विशेष फॉर्म भरावा लागतो. या फॉर्मद्वारे चित्रपटात विविधता, समावेशकता आणि समाजातील सर्व घटकांचा सन्मान राखण्यात आला आहे का, याची तपासणी केली जाते.
‘कांतारा : अ लेजेंड – चॅप्टर 1’ हा चित्रपट भारतीय संस्कृती, लोककथा आणि मातीशी नातं सांगणाऱ्या कथानकामुळे आधीच चर्चेत राहिला आहे, तर ‘तन्वी द ग्रेट’ या चित्रपटातून सामाजिक संवेदनशीलतेचा वेगळा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. या दोन्ही चित्रपटांची ऑस्करच्या बेस्ट पिक्चर यादीत निवड होणे हे भारतीय सिनेमाच्या जागतिक दर्जाची पावती मानली जात आहे.



