नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या डळमळीत अवस्थेत आहे. मागील पाच ते सहा वर्षात थोडीफार प्रगती तरी अर्थव्यवस्थेने केली होती. मात्र आता ती शक्यताही मावळली आहे, अशी टीका अर्थशास्त्रातले नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी केली आहे.
अमेरिकेतल्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावेळी सध्याची भारतीय अर्थव्यवस्था ही अत्यंत डळमळीत झाली आहे, असे मत अभिजित बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. अभिजित बॅनर्जी यांना नुकताच अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जागतिक स्तरावरचे दारिद्र्य कमी करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली. एकीकडे विरोधक सरकारवर ढासळत्या अर्थव्यवस्थेवरुन आणि समोर आलेल्या जीडीपीच्या आकडेवारीवरुन टीका करत असताना आता अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल नोबेल मिळालेल्या अभिजित बॅनर्जी यांनीही ढासळत्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे.