Home आंतरराष्ट्रीय होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू 

होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू 


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। इराण-इस्रायल-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे भारतीय कॅप्टन राकेश रंजन सिंह यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या १८ दिवसांपासून समुद्रात अडकलेल्या या जहाजावरील कर्मचाऱ्यांना योग्य वैद्यकीय सुविधा मिळू न शकल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश रंजन सिंह हे २ फेब्रुवारी रोजी सुट्टी संपवून ‘अवाना’ जहाजावर रुजू झाले होते. हे जहाज तेल वाहतुकीसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे गेले होते. १ मार्च रोजी भारताकडे परतण्यास निघाल्यानंतर वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर जहाजाला समुद्रातच नांगर टाकून थांबावे लागले. या जहाजावर कॅप्टनसह सुमारे ३५ कर्मचारी अडकले होते.

गेल्या १८ दिवसांपासून समुद्रात अडकलेल्या या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः वैद्यकीय सुविधांचा अभाव ही मोठी समस्या ठरली. १८ मार्च रोजी कॅप्टन सिंह यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर जहाजावरील अधिकाऱ्यांनी तातडीने एअर अॅम्ब्युलन्ससाठी दुबई एटीसीशी संपर्क साधला, मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांना परवानगी मिळू शकली नाही.

यानंतर पर्यायी उपाय म्हणून त्यांना बोटीने दुबई किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या प्रक्रियेत मोठा विलंब झाला. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांची प्रकृती आणखी गंभीर झाली आणि अखेरीस हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या मते, योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्यांचा जीव वाचू शकला असता.

कॅप्टन राकेश रंजन सिंह हे मूळचे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफ येथील रहिवासी होते, तर त्यांचे कुटुंब सध्या रांची येथील अर्गोरा परिसरात वास्तव्यास आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय तणावाचा परिणाम समुद्री वाहतुकीवर आणि त्यामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर किती गंभीर होऊ शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound