नवी दिल्ली वृत्तसंस्था । आज पहाटे पाकच्या हद्दीत शिरून दहशतवाद्यांचा खात्मा करणार्या भारतीय वायूदलावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
भारतीय वायूदलाच्या एका पथकाने पाकच्या हद्दीत जाऊन दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले. यामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्याचे दिसून येत आहे. या कारवाईत १२ मिराज या लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला होता. या पथकाने मुजफ्फराबाद, बालाकोट आणि चकोटी येथील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला केला. यात दोनशेपेक्षा दहशतवादी ठार झाले आहेत. विशेष म्हणजे आपली कारवाई पार पाडल्यानंतर भारताचे पथक सुरक्षितपणे भारतात परतले. यामुळे हवाई दलाच्या या शौर्याचे देशभरातून कौतुक करण्यात येत आहे.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी या कारवाईनंतर भारतीय वायूदलाचे तोंड भरून कौतुक केले आहे. यासह विविध पक्षांचे नेते आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही वायूदलाचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, या कारवाईनंतर पंतप्रधान मोदी यांची मंत्रीमंडळातील आपल्या वरिष्ठ सहकार्यांसोबत बैठक सुरू झाली असून यानंतर सरकारतर्फे याबाबत अधिकृत वक्तव्य करण्यात येईल असे मानले जात आहे.
दरम्यान, भारतीय लष्कराने या कारवाईबाबत पहिल्यांदा प्रतिक्रिया व्यक्त करत ट्विटरवर रामधारीसिंह दिनकर यांच्या खालील काव्यपंक्ती उद्धृत केल्या आहेत.
क्षमाशील हो रिपु-समक्ष
तुम हुए विनत जितना ही,
दुष्ट कौरवों ने तुमको
कायर समझा उतना ही।
तर दुसरीकडे भारताच्या या हल्ल्यामुळे धास्तावलेल्या पाकिस्तानने आज सकाळी आपत्कालीन बैठक बोलवली आहे. यात पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह लष्कराचे उच्चाधिकारी आणि आयएसआयचे प्रमुख सहभागी झाल्याचे वृत्त आहे.