महागाईच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली-वृत्तसेवा | जगभरातील व्याजदर आणि महागाई वाढ पुढील काही महिने कायम राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, महागाईच्या बाबतीत भारताचा जगातील देशांमध्ये तिसरा क्रमांक लागतो. बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार रशिया आणि दक्षिण आफ्रिकेला महागाईचा सर्वाधिक फटका बसला आहे.

रशियात महागाई वाढीचा दर 7.5 टक्के तर दक्षिण आफ्रिकेत 5.9 टक्के आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताचा नोव्हेंबरमध्ये महागाई दर 5.6 टक्के होता. ऑस्ट्रेलियामध्ये हे प्रमाण 5.4 टक्के, सिंगापूरमध्ये 4.7 टक्के आणि ब्राझीलमध्ये 4.7 टक्के आहे.

आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2022 च्या तुलनेत नोव्हेंबर 2023 मध्ये साखरेच्या किंमतीत 41 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एक वर्षात तांदूळ 36 टक्क्यांनी महाग झाला आहे.

दुसरीकडे, अनेक देशांमधील तणावामुळे जगभरात कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि कोळशाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. एका वर्षात ब्रेंट क्रूड 8.7 टक्के, कोळसा 62.9 टक्के आणि नैसर्गिक वायू 55.4 टक्क्यांनी स्वस्त झाला आहे.

अहवालानुसार, गेल्या काही महिन्यांपासून भारतात कमी होत असलेली महागाई वाढवण्यात खाद्यपदार्थांच्या किमतींचा मोठा वाटा आहे. नोव्हेंबरमध्ये वाढ झाल्यानंतर डिसेंबरमध्येही किरकोळ महागाई कमी होण्याची आशा नाही. किरकोळ चलनवाढीचा दर सध्या रिझर्व्ह बँकेच्या दोन टक्क्यांच्या तफावतीने खाली आहे.

Protected Content