भारतासह अमेरिकेचाही मालदिवसोबत सहकार्याचा करार

वॉशिंग्टन वृत्तसंस्था । चीनसाठी सामरीकदृष्ट्या महत्त्वाचा असणाऱ्या मालदीवसोबत अमेरिकेने करार केला आहे. हिंदी महासागरात शांतता आणि सुरक्षेसाठी अमेरिकेने मालदीवसोबत संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्यावतीने ही माहिती देण्यात आली आहे. सामरीकदृष्ट्या भारताविरोधात चीनसाठी मालदीव महत्त्वाचा देश आहे. मात्र, भारतानेही चीनला शह देण्यास सुरुवात केली आहे.

अमेरिकेच्या संरक्षण खात्याने सांगितले की, हिंदी महासागरात शांतता आणि सुरक्षिता सुनिश्चित करण्याच्या उद्देश्याने दोन्ही देशांनी मैत्री संबंध घट्ट करण्यासह संरक्षण क्षेत्रात सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने हा करार महत्त्वाचा आहे. कोरोना संसर्गाच्याविरोधात लढण्यासाठी मालदीवला अमेरिका मदत करणार आहे.

अमेरिकेकडून दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशिया विभागाचे उप सहाय्यक संरक्षण मंत्री रीड वर्नर आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मारिया दीदी यांनी १० सप्टेंबर रोजी संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी केली असल्याची माहिती पेंटागॉनने दिली.

हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी भारतही आक्रमक झाला आहे. हिंदी महासागरात सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा देश असणाऱ्या मालदीवमधून चीनला बाहेर काढण्याचे प्रयत्न भारताने सुरू केले आहेत. त्यानुसार आता भारत मालदीवमध्ये ५० कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. यातील १० कोटी डॉलर हे अनुदान असणार आहे.

९० हजार चौकिमी क्षेत्रफळावर पसरलेला मालदीव देश भारतासाठी खुपच महत्त्वाचा आहे. मालदीवच्या समुद्र सीमेलगत भारतीय बेट मिनिकॉयचे अंतर फक्त १०० किमी आहे. तर, केरळच्या दक्षिण भागापासून मालदीवच्या बेटांचे अंतर फक्त ६०० किमी आहे.

चीनकडून भारताची हिंदी महासागरात कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मालदीवचे सामरिकदृष्ट्या महत्त्व लक्षात घेऊन चीनने या देशाला कर्जाच्या विळख्यात अडकवण्याचाही प्रयत्न केला आहे. व्यापाराच्या माध्यमातून चीन या देशावर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. मालदीवमध्ये २०१८ मध्ये नवीन सरकार आल्यानंतर चीनसोबत कोणताही मोठा करार करण्यात आला नाही. त्यातच आता अमेरिकेसोबतही मालदीवने करार केल्यामुळे चीनच्या मनसुब्यांना धक्का बसला आहे

Protected Content