Home राष्ट्रीय जय हिंद : भारताचा एयर स्ट्राईक, ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकड्यांचे कंबरडे मोडले !

जय हिंद : भारताचा एयर स्ट्राईक, ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकड्यांचे कंबरडे मोडले !

0
144

नवी दिल्ली-वृत्तसेवा | पहेलगाम येथील भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर काल रात्री भारतीय सैन्याने पाकमध्ये एयर स्ट्राईक करून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नऊ ठिकाणी भारतीय फायटर विमानांनी जोरदार हल्ला करून पाकचे कंबरडे मोडले आहे. या स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे.

पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने आता स्पष्ट संदेश दिला आहे – प्रत्येक हल्ल्याचा बदला शत्रूच्या भूमीवरच दिला जाईल. या भूमिकेची पहिली झलक ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष कारवाईच्या माध्यमातून मंगळवारच्या मध्यरात्री पाहायला मिळाली.

भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकिस्तान अधिकृत काश्मीर (पीओके) मध्ये एकाच वेळी ९ दहशतवादी अड्ड्यांवर अचूक हवाई हल्ले केले. या ठिकाणांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याचे तळही समाविष्ट होते. या कारवाईचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्रीनंतर पीओकेमधील मुजफ्फराबाद आणि त्याच्या सभोवतालच्या डोंगराळ भागांमध्ये जोरदार स्फोट झाले. या स्फोटांनंतर संपूर्ण शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, हे स्फोट भारतीय लष्कराने केलेल्या मिसाईल स्ट्राइकचे परिणाम होते.

भारतीय लष्कराने ‘एक्स’ (माजी ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर “ऑपरेशन सिंदूर” या शब्दासह एक प्रतिमा शेअर केली. संरक्षण मंत्रालयानेही अधिकृतरित्या या कारवाईची पुष्टी केली असून सांगितले की, हे हल्ले अशा परिसरांवर केंद्रित होते जिथून भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया आखल्या जातात.

पीआयबी (प्रेस इन्फर्मेशन ब्युरो) च्या प्रेस नोटनुसार, एकूण ९ दहशतवादी अड्ड्यांवर टप्प्याटप्प्याने आणि अचूक लक्ष्य करत कारवाई करण्यात आली. भारताने यावेळी कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य केले नसून ही कारवाई संयम, विवेक व परिपक्वतेने करण्यात आल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने एआरवाय न्यूजला सांगितले की, भारताने तीन ठिकाणी मिसाईल हल्ले केले असून पाकिस्तान याचे प्रत्युत्तर देईल. मात्र भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ही कारवाई केवळ दहशतवादी तळांवर केंद्रित होती.

‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात आज दुपारी भारत सरकारकडून सविस्तर पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे.


Protected Content

Play sound