Home क्रीडा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीत भारताचा पराभव

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीत भारताचा पराभव


कोलकाता-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ईडन गार्डन्स येथे खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 30 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या दिवशी विजयासाठी केवळ 124 धावांचे लक्ष्य असूनही भारत केवळ 93 धावांवर कोसळला आणि दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या अनपेक्षित पराभवाचा थेट परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2025–27) गुणतालिकेवर झाला असून भारत चौथ्या स्थानावर घसरला आहे.

या सामन्यापूर्वी भारत WTC पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर होता. मात्र कोलकाता कसोटीत दारुण पराभवानंतर भारताची गुण टक्केवारी 54.17 इतकी घसरली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांत भारताने 4 विजय आणि 3 पराभव नोंदवले आहेत. त्यामुळे पुढील सामन्यांमध्ये भारतावर पुनरागमनाचे प्रचंड दडपण आहे.

कोलकात्यातील विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने चौथ्या स्थानावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. 3 सामन्यांत 2 विजय आणि 1 पराभव अशा कामगिरीमुळे त्यांची गुण टक्केवारी 66.67 इतकी झाली आहे. यामुळे WTC च्या शर्यतीत दक्षिण आफ्रिकेने आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.

गुणतालिकेच्या शिखरावर ऑस्ट्रेलिया असून त्यांचे 100% गुण कायम आहेत. त्याचवेळी श्रीलंका 66.67% गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंड अनुक्रमे पाचव्या ते नवव्या स्थानांवर आहेत. विशेष म्हणजे न्यूझीलंडने या चक्रातील एकही सामना अद्याप खेळलेला नाही.

नाणेफेक जिंकून टेम्बा बावुमाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने 159 धावांची मजल मारली. जसप्रीत बुमराहने पाच बळी घेत उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र भारताने पहिल्या डावात केवळ 189 धावा करत 30 धावांची आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 153 धावांवर संपल्याने भारतास विजयासाठी 124 धावांचे सोपे लक्ष्य मिळाले होते. परंतु भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा कोसळली आणि फक्त 93 धावांत संपूर्ण संघ पॅकअप झाला.

टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने खेळलेल्या 11 कसोटींपैकी 10 सामने जिंकले आहेत. त्यांची कप्तानी यशस्वी ठरल्याचे प्रमाण या विजयाने पुन्हा सिद्ध केले. मालिकेतील पुढील सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे रंगणार असून भारतासाठी हा सामना ‘करो अथवा मरो’ ठरणार आहे.


Protected Content

Play sound