नवीदिल्ली (वृत्तसंस्था) भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चीनमधील भारत, चीन आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताने सीमेपपलिकडे केलेल्या कारवाईची माहिती देतानाच, पाकिस्तानला घेरत जगापुढे भारताची बाजू जोरकसपणे मांडली. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाल्यानंतर भारताने जैश-ए-मोहम्मदच्या विरोधात कारवाईचे पाऊल उचलले असून आता दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची वेळ आली असल्याचेही स्वराज यांनी ठासून सांगितले.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद या संघटनेवर कारवाई करावी अशी मागणी भारताबरोबरच जगभरातून होत होती. मात्र जगभरातून झालेले या आवाहनाकडे पाकिस्ताने डोळेझाक केली. इतकेच नाही, तर जैश-ए-मोहम्मदने पुलवामा दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतल्याच्या वृत्ताचाही इन्कार केला. याच कारणामुळे भारताला ही कारवाई करावी लागली अशी माहिती स्वराज यांनी दिली.
ठोस माहितीनंतरच हल्ले : स्वराज – भारताने सांगून देखील पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कारवाई करण्यास सतत इन्कार केला. पुलवामा हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद भारतातील अन्य ठिकाणांवर कारवाई करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती भारताला गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली. त्यानंतरच भारताने जैशच्या तळांवर हल्ले, अशी माहिती स्वराज यांनी बैठकीत दिली. मात्र या कारवाईदरम्यान, पाकिस्तानच्या कोणत्याही नागरिकाला ईजा पोहोचू नये, याची काळजी घेतली गेल्याचेही त्या म्हणाल्या.
माहिती देताना स्वराज पुढे म्हणाल्या की, भारताने केलेली कारवाई ही विनालष्करी कारवाई होती. कारण यात कोणत्याही लष्करी तळांवर हल्ले केले गेले नव्हते. जैशच्या तळांना उद्ध्वस्त करणे हाच या कारवाईचा उद्देश होता. भारत आणि चीनदरम्यानचे संबंध अतिशय महत्त्वाचे असल्याचेही स्वराज म्हणाल्या. २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यातील चर्चेनंतर भारत-चीन दरम्यानच्या संबंधात चांगली सुधारणा झाल्याचेही स्वराज यांनी बैठकीत सांगितले.