नवी दिल्ली-वृत्तसेवा । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (16 फेब्रुवारी) सायंकाळी 5 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट एक्सपो 2026’चे भव्य उद्घाटन होणार आहे. 16 ते 20 फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या एक्सपोसोबत ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’चेही आयोजन करण्यात आले असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील भारताची ताकद आणि जागतिक सहकार्याचे दर्शन या माध्यमातून घडणार आहे.
हा एक्सपो 70 हजार स्क्वेअर मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळात भरवण्यात आला असून, ग्लोबल टेक कंपन्या, स्टार्टअप्स, संशोधन संस्था, केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि आंतरराष्ट्रीय भागीदार यात सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलिया, जपान, रशिया, युनायटेड किंग्डम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, सर्बिया, एस्टोनिया, ताजिकिस्तान आणि आफ्रिका अशा 13 देशांचे स्वतंत्र पवेलियन उभारण्यात आले आहेत.

एक्सपोमध्ये 300 हून अधिक प्रदर्शन पवेलियन आणि लाईव्ह प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली आहेत. ‘People, Planet and Progress’ या थीमवर आधारित हे प्रदर्शन असणार आहे. 600 हून अधिक स्टार्टअप्स आपल्या एआय आधारित नाविन्यपूर्ण उपायांचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमात देश-विदेशातील मिळून सुमारे 25 लाख लोक सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
इंडिया एआय इम्पॅक्ट एक्सपो आणि समिटदरम्यान 500 हून अधिक सेशन आयोजित करण्यात येणार असून, 3250 पेक्षा अधिक जागतिक तज्ज्ञ, स्पीकर्स आणि पॅनल सदस्य सहभागी होतील. विविध क्षेत्रांमध्ये एआयचा होणारा प्रभाव, धोरणात्मक दिशा आणि भविष्यातील संधी यावर चर्चा होणार आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्यासह अनेक देशांचे मंत्रीस्तरीय प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.
तसेच जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांमध्ये सुंदर पिचाई, सॅम ऑल्टमन, डेमिस हसाबिस, डारियो अमोदेई आणि ब्रॅड स्मिथ यांचा सहभाग अपेक्षित आहे.
हे शिखर संमेलन भारतासाठी केवळ एक कार्यक्रम नसून, एआय क्षेत्रातील जागतिक नियम, मानके आणि संधी घडवण्यात भारत अग्रणी भूमिका बजावण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. या माध्यमातून नवोन्मेष, उद्योग सहकार्य आणि तंत्रज्ञानाचा फायदा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे.



