
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक ३ ‘ड’ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अपक्ष उमेदवार ललित विजय नारखेडे यांनी आपल्या आक्रमक आणि लोकाभिमुख प्रचारशैलीमुळे प्रस्थापित उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. मतदारांशी थेट संवाद, रस्त्यावर उतरून केलेला प्रचार आणि विकासाच्या मुद्द्यांवर दिलेला भर यामुळे त्यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिक धारदार होताना दिसत आहे.

बुधवारी सकाळी ललित नारखेडे यांनी डीएनसी नगर व परिसरातील विविध वसाहतींमध्ये झंझावाती दौरा करत घरोघरी भेटी दिल्या. या दौऱ्यात त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या तसेच पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची अवस्था, मूलभूत सुविधा आणि स्थानिक विकासाचे प्रश्न प्राधान्याने मांडले. थेट संवादातून मतदारांचा विश्वास संपादन करण्याचा त्यांचा प्रयत्न अनेकांना भावल्याचे चित्र दिसून आले.
यानंतर गुरुवारी ८ जानेवारी रोजी कावेरी हॉटेल परिसरात ललित विजय नारखेडे यांच्या वतीने भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ श्री विश्वेश्वर महादेव मंदिर येथून करण्यात आला. धार्मिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देत रॅलीने परिसरातील विविध भागांतून मार्गक्रमण केले.
ही प्रचार रॅली महालक्ष्मी पार्क, गीताई पार्क, सुंदर नगर यासह इतर वसाहतींमधून जात असताना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक ठिकाणी नागरिकांनी रॅलीचे स्वागत करत नारखेडे यांच्याशी संवाद साधला. काही मतदारांनी त्यांच्या स्पष्ट भूमिकेचे आणि स्थानिक प्रश्नांवरील अभ्यासपूर्ण मांडणीचे कौतुक केले.
अपक्ष उमेदवार असूनही नारखेडे यांनी उभे केलेले संघटन, कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि मतदारांचा वाढता पाठिंबा यामुळे प्रभागात राजकीय समीकरणे बदलत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पारंपरिक पक्षीय उमेदवारांसाठी हा प्रचार निश्चितच डोकेदुखी ठरत असून, निवडणूक लढत अधिक चुरशीची होत असल्याचे संकेत मिळत आहेत.



