जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आरोग्यसेवक हे गेल्या दहा वर्षांपासून कमी मानधनावर काम करत आहे. मानधन वाढविने, कायमस्वरूपी कामावर घेणे यासह प्रलंबित विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी, समायोजन कृती समितीच्या वतीने सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले.
दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अधिकारी व कर्मचारी हे गेल्या १० वर्षांपासून कंत्राटी पध्दतीने काम करत आहे. मानधन कमी असल्यावर देखील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर परिचारीका हे काम करत आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी वारंवार करण्यात आली. मुंबईत आंदोलन देखील करण्यात आले. परंतू शासनाकडून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. ओडिशा, मणिपूर, राजस्थान, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि मध्य प्रदेशातील सरकारने राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यासाठी २५ ऑक्टोबरपासून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेसमोर राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी, समायोजन कृती समितीतच्या वतीने सामेवार ६ नोव्हेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणारे सर्व डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे पहायला मिळाले.