अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उन्हाळा संपत आल्याने पावसाळ्यापूर्वी शेतीमशागतीच्या कामांना वेग आला आहे. असे असताना रस्त्याच्या कडेला शेतीचे क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांकडून बांधावरचे व रस्त्याच्या कडेला असलेले गवत व काडी कचरा पेटवले जात असून तालुक्यातील सावखेडा परिसरात रस्त्यावर आगीचे डोंब व धुराचे लोड पसरत असल्याने वाहनांचे अपघात होण्याची संभावना निर्माण होत आहे.
सध्या कडक उन्हाळा व त्यात उच्च तापमानाच्या लाटेमुळे जनता होरपळून निघत आहे. आता पावसाळ्यापूर्वी शेतीच्या मशागतीचे कामे सुरू असल्याने शेती सुपीक करण्याची तयारी सुरू झालेली आहे. शेतातील काडी, कचरा व इतर घाण शेतात पेटवली जात आहे. मात्र रस्त्याच्या कडेला शेतीचे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांकडून रस्त्याच्या कडेला असलेल्या गवत, काडी कचरा व बाभळाची झाडे पेटवली जात आहे. त्यामुळे त्या पेटत्या आगीचे डोंब व धुळाचे लोड रस्त्यावर येत असून आगीची उष्णता थेट रस्त्यावर येत आहे. परिणामी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना आपली वाहने थांबवावी लागत असून धुरामुळे समोरची वाहने दिसत नाही. म्हणून वाहने थांबवून वाहनांच्या रांगा लावल्या जातात तर काही वाहनधारक तशाच आगीच्या दाहकतेत व धुरात वाहने पास करीत असतात. त्यामुळे वाहनांच्या अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असाच प्रकार सोमवारी रोजी दहा वाजेच्या सुमारास सावखेडा येथील शेतकऱ्याने सावखेडा शिवारात केल्याचे दिसून आला. शेतकरी आग लावून तसाच पाहत राहिला. मात्र त्याचा परिणाम वाहन धारकांना सहन करावा लागला. अक्षरशः वाहनधारकांना आपली वाहने उभी करावी लागली. तर काही वाहने तशाच आगीच्या दाहकतेत निघून गेले. मात्र आगीची उष्णता लांब लांबपर्यंत पोहोचत होती. यामुळे वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागला. अशा आगी लावण्याच्या प्रकाराने रस्त्यावरील लावलेली झाडे व असलेली झाडे जळून नष्ट होत असून यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास देखील होत आहे.
एकीकडे शासन वृक्षांच संगोपन व संवर्धन यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत आहे तर, दुसरीकडे रस्त्याच्या कडेला आगी लावण्याचे प्रकार सर्रासपणे दिसून येत आहेत. यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. रस्त्याच्या कडेला शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला असलेली काटेरी झुडपे व गवत पेटवू नये वृक्षारोपण केलेले कोवळे वृक्षही वाचण्यासाठी प्रयत्न व्हावेत. असे आवाहन पर्यावरण प्रेमी सागर मोरे यांनी केले आहे.
.