काँग्रेसच्या लेखा विभागावर आयकर विभागाचा छापा

 

congresss

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि हरियाणामधील प्रचार शिगेला पोहोचत असताना कॉंग्रेसच्या मुख्यालयातील लेखा विभागात आयकर विभागाने छापा टाकला. याव्यतिरिक्त लेखा विभागातील पाच पगारदार कर्मचार्‍यांच्या घरावर ही आयकर विभागाने छापा टाकला असून कर्मचार्‍यांच्या नातेवाईकांचीही चौकशी करण्यात येत आहे.

दिल्लीतील २४, अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयातील लेखा विभागाच्या कार्यालयाला प्राप्तिकर खात्याने सीलबंद केले असून, या विभागात काम करणाऱ्या पाच पगारदार कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी छापे घातले आहेत. शुक्रवारपासून सुरू झालेली ही कारवाई अजूनही सुरूच असून, काँग्रेस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर अधिकारी ठाण मांडून बसले असल्याची माहिती आहे. या कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांकडे जाऊन प्राप्तिकर अधिकारी विचारपूस करण्यात येत आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या लेखा विभागालाही प्राप्तिकर खात्याने टाळे ठोकले आहेत. ‘लोकसभा निवडणुकीवर ४० हजार कोटी रुपये खर्च करणाऱ्या भाजपकडे पैसा कुठून आला, याची विचारणाही कुठली संस्था करीत नाही आणि दुसरीकडे पाच वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या काँग्रेसच्या कर्मचाऱ्यांवर सूडबुद्धीने छापे घालण्यात येत आहेत, ही शरमेची गोष्ट आहे. या देशात विरोधकांसाठी एक आणि भाजपसाठी दुसरी अशा दोन नियमावली, दोन कायदे, दोन घटना आहेत. ही देशाच्या लोकशाहीसाठी वाईट बातमी आहे,’ अशी टीका काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली.

Protected Content