Home Cities जळगाव रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची उपस्थिती

रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन; पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची उपस्थिती


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मायादेवी नगर येथील रोटरी भवन येथे आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी ‘आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत आहाराचा फार मोठा वाटा आहे. आरोग्य टिकवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वडिलोपार्जित रानभाज्यांचा आहारात समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे,’ असे आवाहन केले. ‘रानभाज्या ही निसर्गाची देण असून, त्या सेंद्रिय, सुरक्षित व पोषक असतात. कोरोना काळात याच रानभाज्यांनी अनेकांना आरोग्य दिले होते,’ असेही ते म्हणाले.

प्रकल्प संचालक (आत्मा) जळगाव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र जळगाव-पाल आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात जिल्हाभरातून आलेल्या शेतकरी गट व महिला बचत गटांनी पारंपरिक पद्धतीने पिकवलेल्या रानभाज्या आणि प्रक्रिया उद्योगाचे तब्बल ८० स्टॉल लावून पावसाळी हंगामातील विविधतेचा मेवा रसिकांसमोर मांडला. पालकमंत्र्यांनी यावेळी विविध रानभाज्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला. तसेच, रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्यातर्फे ७५ गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार दप्तरांचे वाटपही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. आदिवासी महिलांनी पारंपरिक रानमेवा भेट देऊन पालकमंत्र्यांचे स्वागत केले.

महोत्सवामध्ये यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक आदिवासी नृत्य व वाद्ये सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले. ग्राहकांसाठी रानभाज्यांच्या विक्रीसोबतच विविध रानभाज्यांच्या पाककृतींची माहिती देण्यात आली. पाककला स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मॉडेल अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी केले, तर आभार प्रकल्प उपसंचालक भरत इंगळे यांनी मानले.

या प्रसंगी आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे अध्यक्ष गौरव सापळे, प्रकल्प प्रमुख योगेश भोळे, सचिव देवेश कोठारी, महेश सोनी, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound