जळगाव, प्रतिनिधी | शहरात “चला जाऊ परत निसर्गाकडे” ही एकदिवसीय विषमुक्त अन्न आणि टेरेस गार्डन कार्यशाळा जळगाव जिल्हा सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती जनआंदोलन समितीतर्फे रविवारी आयोजित करण्यात आली आहे. परिषदेचे सकाळी ९ वाजता पद्मश्री डॉ.सुभाष पाळेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
उद्घाटनानंतर डॉ. सुभाष पाळेकर यांनी दिवसभरात उपस्थित जळगावकरांना आणि निसर्गप्रेमींना नैसर्गिक जीवनशैली कशी असावी याचे धडे दिले. विषमुक्त अन्न छतावर कसे तयार करावे व त्याचे फायदे याबाबत तसेच घराच्या गच्चीवर कशाप्रकारे नैसर्गिक बाग फुलवायची या विषयी डॉ. पाळेकर यांनी सांगितले.
राज्यभरातून नागरिकांनी उपस्थिती लावली होती. नागरिकांनी प्रश्नोत्तरद्वारे माहिती जाणून घेतली. कार्यशाळेला २३० नागरिकांनी उपस्थिती दिली. “अन्न हे पूर्ण ब्रम्ह ” आहे असे आपण म्हणतो परंतु हेच अन्न आता विविध आजारांचे कारण बनत आहे. कारण उत्पादन वाढीच्या हव्यासापोटी मोठ्याप्रमाणात रासायनिक खते व कीटकनाशकं यांचा अनिर्बंध वापर होत आहे. यामुळे अन्न तर विषारी होतंच आहे पण त्याचे पोषणमूल्य ही कमी झाले आहे. विषारी अन्न खाल्ल्याने कॅन्सर, हृदय विकार, डायबेटीस यासारखे अनेक जीवघेणे आजार वाढत आहेत. मानवा बरोबर पशु, पक्षी, जीव, जंतू यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, जमीन नापीक झाली आहे, निसर्गाचा असमतोल वाढला आहे, वैश्विक तापमान वाढीचे संकट उभे राहिले आहे. या सर्वांवर एकमात्र व हमखास उपाय म्हणजे पद्मश्री, कृषी ऋषी, डॉ सुभाष पाळेकर यांनी शोधून काढलेली नैसर्गिक शेती पध्दती. परंतु आपल्या पैकी प्रत्येकाकडेच शेती आहे असे नाही म्हणून आपल्याला व आपल्या पुढील पिढीला निरोगी ठेवण्या साठी आपल्या परसबागेत,गच्चीवर, घराजवळील मोकळ्या जागेत , गॅलरीत टेरेस गार्डनच्या माध्यमातून घरच्या घरीच आपल्या पुरता विषमुक्त भाजीपाला, फळे नैसर्गिक पद्धतीने मिळविण्याचे सहज सोपे तंत्र तसेच विषमुक्त अन्नाचे आहारातील महत्व, निरोगी जीवनशैली कशी असावी यासर्वांवर मार्गदर्शन केले.