चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वाघळी येथील मशीद परिसरात लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. याचे उद्घाटन चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याहस्ते करण्यात आले.
वाघळी येथे ईद-ए-मिलाद निमित्ताने बैठक घेण्यात आली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी गावातील दोन्ही समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी चर्चा केली. यावेळी जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. वाघळी गावातील नागरिकांना दोन महिन्यांपूर्वी लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बाबत पोलीस प्रशासनाने विनंती करण्यात आली होती. त्यानुसार गावात मश्जिद परिसरात लोकवर्गणी करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. आज सीसीटीव्ही कॅमेरेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याहस्ते करण्यात आले. त्या कार्यक्रमाला जि. प. सदस्य पोपट तात्या भोळे, मौलाना शाहरुख उस्मान, मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष सईद मुसा खाटीक, सदस्य हाजी रऊफ शेख जमाल, शेख अनिस शेख युनूस, सरपंच जावेद मुल्ला, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष आणि पोलिस पाटील यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.
दरम्यान पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या संकल्पनेतून गावात शांतता राहावी व जातीय सलोखा अबाधित राहावा, यासाठी राष्ट्रीय एकात्मतेबाबत घोषवाक्य लिहून स्वाक्षरी मोहीम राबविण्याचे सूचना देण्यात आले आहे. या मोहिमेत गावात वाघळी गावाची निवड करण्यात आली आहे. शनिवारी ७ मे रोजी ही मोहीम सकाळी १० वाजेपासून सुरुवात करण्यात येणार असून या मोहिमेत जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.