जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसून देशाच्या विकास आराखड्याचा पाया आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी करत जळगाव येथे जनगणना 2027 अनुषंगाने आयोजित तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केले.
जनगणना संचालनालय, मुंबई आणि जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे 23 ते 25 मार्च 2026 या कालावधीत हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जनगणनेचा इतिहास इ.स.पूर्व 300 वर्षांपर्यंत पोहोचत असल्याचे नमूद करत तिच्या सातत्याने होत असलेल्या आधुनिकीकरणावर प्रकाश टाकला.

ते पुढे म्हणाले की, 2011 ते 2026 या कालावधीत जनगणना प्रक्रियेत मोठे तांत्रिक बदल झाले असून पारंपरिक कागदी पद्धतीऐवजी आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. नागरिकांसाठी सेल्फ-एन्युमरेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून अधिकाऱ्यांसाठी रिअल-टाइम मॉनिटरिंग, डॅशबोर्ड आणि गुणवत्ता नियंत्रणाची यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. या आधुनिक साधनांमुळे प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे काम अधिक अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या तीन दिवसीय प्रशिक्षणात प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सखोल मार्गदर्शन केले जाणार असून जनगणनेच्या प्रत्येक टप्प्याबाबत त्यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. मार्च अखेरचा कालावधी शासकीय कामकाजासाठी अत्यंत व्यस्त असला तरी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणाकडे गांभीर्याने पाहावे आणि पूर्ण लक्षपूर्वक सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. ही वर्षभर चालणारी प्रक्रिया असून प्रत्येकासाठी आयुष्यातील एकदाच येणारा अनुभव असल्याचे सांगत त्यांनी याकडे जबाबदारी आणि संधी म्हणून पाहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात जनगणना संचालनालय, मुंबईचे सहायक संचालक अजय ठाकूर आणि कार्यालयाचे प्रतिनिधी विशाल दिवेकर हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करत आहेत.
कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी वैशाली चव्हाण, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषदांचे मुख्याधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



