लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची गर्दी पाहता बँकेत व्यवस्था वाढवा; तहसीलदारांचे आदेश

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा दिल्या जाणाऱ्या १५०० रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ घेण्यासाठी महिलांची बँकांमध्ये गर्दी होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले होते. ही रक्कम काढण्यासाठी महिलांनी पहाटेपासूनच बँकांसमोर रांगा लावल्या होत्या.

रावेर तालुक्यातील एका बँकेसमोर यामुळे तुंबळ गोंधळ आणि हाणामारीची घटना घडली होती. या घटनांमुळे महिलांना अनावश्यक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार बंडू कापसे यांनी आज स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला भेट दिली. त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना महिलांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तहसीलदारांनी बँक कर्मचाऱ्यांना महिलांसाठी बसण्याची व्यवस्था वाढवण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत, तसेच योग्यरित्या माहिती देण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. महिलांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ त्यांना सुलभतेने मिळावा यासाठी प्रशासन उपाययोजना करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Protected Content