जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील उमाळा घाटात ट्रक आडवून चालकाला चाकूचा धाक दाखवत खिश्यातील ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चार भामट्यांनी जबरी हिसकावून दुचाकीने पळ काढल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी अज्ञात चार जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, सोनाजी अशोक मिरगे (वय-३०) रा. रहमेबाद ता. सिल्लोड जि. औरंगाबाद हे ट्रक चालक आहे. त्यांच्याकडे सतपाल शर्मा यांच्या मालकीचा ट्रक (एमएच ४६ एफ ५३४५)वर चालक म्हणून काम करतात. ५ जून रोजी रात्री ८.३० वाजता सोनाजी मिरगे यांनी तालुक्यातील चिंचोली येथील गोडावून मधून रिकाम्या बाटल्यांचा माल घेवून ट्रकने औरंगाबाद येथे जात असतांना उमाळा घाटात रात्री ११.३० वाजेच्या सुमारास चार जण दुचाकीवरून येवून ट्रकच्या समोर उभी केली. त्यावेळी ट्रकचालकाने ट्रक थांबविला. चाकूचा धाक दाखवून पैसे दे असे सांगितले. मात्र आपल्याकडे पैसे नसल्याचे ट्रक चालकाने सांगितले. ट्रक चालकाच्या खिश्यातील ७ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून चौघे एकाच दुचाकीने पसार झाले. ट्रक चालकांने दुचाकीचा पाठला गेला त्यावेळी त्यांना दुचाकीचा क्रमांक एमएच १९ डीए १२८३ असल्याचे लक्षात ठेवले. आज रविवारी सायंकाळी ट्रक चालक सोनाजी मिरगे यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेतली. मिरगे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तडवी करीत आहे.