रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाल येथे सालाबादप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त मंगळवार १६ जुलै रोजी श्री वृन्दावन धाम आश्रमात परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या समाधी दर्शनाकरिता भाविक येणार आहेत. या सोहळयात देशभरातील ८ ते ९ राज्यातील सुमारे ५० हजारांपेक्षा जास्त भाविक सहभागी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
प. पू. सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या समाधी दर्शन सोहळ्याची अखिल भारतीय चैतन्य साधक परिवारातर्फे श्री वृन्दावन धाम पाल आश्रमात विद्यमान गादीपती संत श्री गोपाल चैतन्य महाराज आणि ब्रम्हचारी यांच्या सानिध्यात जय्यत तयारी करण्यात येत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून भाविकांच्या सोयीकरिता वॉटर प्रुफ सत्संग पांडाल तसेच निवासस्थानाची व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचबरोबर भोजन व्यवस्था, शौचालय, स्नान आदिची व्यवस्था, आरोग्यची काळजी घेण्याकरिता साधकतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच सुव्यवस्थेकरिता चैतन्य सेक्युरिटी संघतर्फे , जल व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, पत्रकार व्यवस्था, पूज्य बापूजी समाधी दर्शन आणि हरिधाम मंदिर दर्शन व्यवस्था,पादत्राने व्यवस्था, गुरु दिक्षेकरिता व्यवस्था, अतिथि व्यवस्था, भोजन वाटप व्यवस्था आदि व्यवस्थेचे नियोजन करण्यात येत आहे . त्या करिता युवा संघतर्फे तयारीला सुरुवात झालेली आहे. पूज्य बापूजी च्या समाधि दर्शनाकरिता देशभरातील ८ ते ९ राज्यातून हजारो भाविक पाल येथे येतात. यादरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या करिता पोलिस प्रशासन सज्ज आहे. तसेच भाविकांना पाल येथे जातांना त्रास होऊ नये यासाठी रावेर ते पाल करिता ज्यादा बस सेवापुरविण्याबाबत आगार प्रशासन तसेच पाल गावात स्वछता करिता ग्रामपंचायत याना चैतन्य साधक परिवार रावेर तालुका समितितर्फे निवेदन देण्यात आले आहे.